रानमळा येथे दिलीप वळसे पाटील महाविद्यालयाच्या विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन
1 min read
रानमळा दि.१८:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी शिबिर मौजे रानमळा (ता.जुन्नर) येथे शुक्रवार दि.१९ ते गुरुवार दि.२५ जानेवारी या कालावधीत आयोजित केल्याची माहिती राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीन मोजाड यांनी दिली.
“युवकांचा ध्यास, ग्राम शहर विकास” अंतर्गत लोकसंख्या नियंत्रण जनजागृती ही संकल्पना घेऊन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक रानमळा येथे स्वच्छ गाव समृद्ध गाव, शाश्वत व सर्वांगीण ग्रामीण विकास, लोकसंख्या सर्वेक्षण आणि गावचा इतिहास, स्त्री जन्माचे स्वागत व बालविवाह बंदी,
व्यसनमुक्ती व आरोग्य संवर्धन, मतदार जनजागृती अभियान, वृक्षारोपण, माती परीक्षण, जलसंवर्धन, वनराई बंधारे यासारखे सामाजिक जिव्हाळ्याचे उपक्रम शिबिर कालावधीत गावांमध्ये राबविणार असल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. छाया जाधव यांनी सांगितले.
या शिबिर कालखंडामध्ये व्यक्तिमत्व विकास ‘झिरो ते हिरो’, शेती- काल,आज, उद्या, शिवव्याख्यान, वाढती लोकसंख्या आणि युवकांची भूमिका, सायबर सिक्युरिटी सारख्या विविध विषयावर तज्ञ व्याख्यात्यांच्या व्याख्यानांचे आयोजन केलेले आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या या श्रमसंस्कार शिबिरासाठी संस्थेचे संस्थापक व पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी शुभेच्छा व्यक्त करून महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी तसेच रानमळा गावातील ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन स्वयंसेवकांना सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
तसेच संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, सचिव परेश घोडे, खजिनदार निमगाव सावा चे सरपंच किशोर घोडे आणि संस्थेच्या सर्व संचालकांनी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक हे उत्कृष्ट काम करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.