सोलापूर-गोवा विमानसेवेचा शुभारंभ; प्रवाशांना पुष्पमाला घालून सत्कार
1 min read
सोलापूर दि.१०: – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील १० वर्षांत विमानक्षेत्रात मोठी क्रांती घडली आहे. मागील ७० वर्षांत २०१४ पूर्वी देशात ७४ विमानतळ होते. देशात १६१ विमानतळ कार्यान्वित आहेत. त्यातीलच सोलापूरचे हे एक विमानतळ आहे. उडान योजनेअंतर्गत सोलापूरच्या विमानतळाचा विकास झाला. मोठ्या प्रमाणावर कामे झाली. सोलापूरकरांना विमानसेवेसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागली आहे.सोलापूर-गोवा विमानसेवेला प्रारंभ झाला आहे. येत्या दीड ते दोन महिन्यांत सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे.
अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. मुरलीधर मोहोळ म्हणाले, सोलापूर या देशातील विमान क्षेत्राशी आता जोडले गेले आहे.पंढरीचा पांडुरंग, तुळजापूरची तुळजाभवानी, सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ ही खूप मोठी श्रद्धास्थाने आहेत.
आगामी काळात पर्यटन, व्यापार, उद्योग आणि शेती उद्योगाला चालना मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, गोव्यातून सोलापूरला आलेल्या विमानातील सर्व प्रवाशांचे सोलापुरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर सोलापुरातून गोव्याला जाणाऱ्या सर्व प्रवाशांना पुष्पमाला घालून त्यांचा सत्कार करण्यात आला.