भोंगा वाजला की दररोज गावातील दोन तास टीव्ही, फोन बंद
1 min read
धाराशिव दि.१०:- उमरगा तालुक्यातील जकेकुरवाडी येथे गेल्या तीन वर्षांपासून गावात मुलांच्या अभ्यासासाठी दोन तास घरातील टीव्ही आणि मोबाइल बंद ठेवण्यात येतात. ग्रामपंचायतीचा भोंगा वाजला की, दररोज सायंकाळी सहा ते आठपर्यंत ही साधने बंद राहत असल्याने त्याचा फायदा विद्यार्थ्यांनाही झाला आहे.
गेल्या काही वर्षांत संवादाचे माध्यम असलेल्या मोबाइल तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल झाला आहे. सध्या घरोघरी टीव्ही, मोबाइल, संगणक, लॅपटॉप आदी वस्तू दैनंदिन कामासाठी वापरतात. नवीन पिढी तर या सर्व साधनांची पुरस्कर्ती झाली आहे.
सुरुवातीला कुतूहल म्हणून लहान मुलांच्या हातात दिलेला मोबाइल त्यांच्या सवयीचा भाग बनला आहे. गावोगावी टीव्हीवर मालिका,मोबाइलमुळे लहान मुलांच्या अभ्यासावर, तसेच इतर दुष्परिणाम होत आहेत. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन २२०० लोकसंख्या असलेल्या जकेकुरवाडीचे तरुण सरपंच अमर सूर्यवंशी यांनी यावर एक उपाय शोधला.
त्यातून विद्यार्थ्यांनाही नवी दिशा मिळाली. गावात जिल्हा परिषदेची पहिली ते आठवीपर्यंत शाळा आहे. शाळेत दीडशे विद्यार्थी असून मुलांना अभ्यास करता यावा, म्हणून गावात टीव्ही व मोबाइल दररोज दोन तास बंद करण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला ग्रामस्थांना त्यांनी या निर्णयाचे महत्त्व समजावून सांगितले. मोबाइल, टीव्ही बंद राहावेत, म्हणून भोंग्याच्या माध्यमातून आठवण करून दिली जाते. विशेष म्हणजे या निर्णयाने नागरिकांचा एकमेकांशी संवाद वाढला आहे. विद्यार्थी व पालकांनी चांगला प्रतिसाद दिला असून, याचे शंभर टक्के पालन होत असल्याचे
सरपंच सूर्यवंशी यांनी सांगितले. दररोज संध्याकाळी ठरवलेल्या नियमितपणे टीव्ही आणि मोबाइल बंद ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीवर भोंगा लावण्यात आला आहे. भोंग्याचा आवाज कानावर पडताच घरा-घरांतील टीव्ही, मोबाइल बंद होतो. सर्व मुले घरी जाऊन अभ्यासाला बसतात. यादरम्यान एकही मुलगा घराबाहेर पडत नाही.
