”देव तारी त्याला कोण मारी चा प्रत्यय”; बदगीच्या घाटात दुचाकी काळोखात १०० फूट खोल कोसळली; दोन दुचाकीस्वार बालंबाल बचावले
1 min readखामुंडी दि.१६:- नगर – कल्याण महामार्गावरील खामुंडी (ता.जुन्नर) ते बदगी (ता.अकोले) चे घाटात रविवार ता.१४ रात्रीचे ९ वाजण्याचा सुमार, चोहोबाजूंनी किरर्र दाट झाडी, कमालीचा रात्रीचा काळोख, रस्ता सुंसान असतो. बिबट्यांची मोठी दहशत असलेला हा परिसर, घाटाची अतीतीव्र उतारांची वळणे असलेला व चिवळ रस्ता असलेला आणि जागोजागी संरक्षक कठडे नसलेला हा खामुंडी ते बदगी या मार्गावरील घाटात थंडीने कुडकुडत गार झालेले दोन दुचाकीस्वार बदगीहून कामानिमित्त खामुंडीच्या दिशेने येत असताना एका क्षणी अचानक बदगीचे घाटात वळणावर तीव्र उताराचा अंदाज न आल्यामुळे सुमारे १०० फूट खोल दरीत दुचाकीसह कोसळले व गंभिररित्या जखमी झाले. सदर अपघाताबाबत पिंपरी पेंढार गावचे पोलीस पाटील संकेत जोरी यांनी खामुंडी येथील समाजसेवक व पत्रकार कैलास बोडके यांचेसोबत फोनवरून संपर्क करून घटनेबाबत माहिती देत मदत करण्याविषयी कळविले तसेच आम्ही रुग्णवाहिका घेऊन येत असल्याचेही कळविले. त्यानुसार कैलास बोडके यांनी अत्यंत जलदगतीने हालचाल करून खामुंडी येथील अक्षय जाधव, कुणाल डुंबरे, नवाज पिरजादे, बाळासाहेब शिंगोटे, प्रसाद शिंगोटे, अक्षय बोडके, अक्षय शिंगोटे, पवन शिंदे, तेजस शिंदे, ऋषिकेश बोडके, गौरव गंभीर, संतोष शिंगोटे, जालिंदर शिंगोटे, संतोष डुंबरे, प्रवीण शिंगोटे, विघ्नेश बोडके, हेमंत बोडके. आकाश बोडके या तरुणांना मोबाइलद्वारे गोळा करून आणि सोबत घेऊन तात्काळ घाटाच्या दिशेने दुचाकी सुसाट सोडल्या व घटनास्थळ गाठून जखमींना ताब्यात घेतले, तो पर्यंत पोलीस पाटील जोरी हे रुग्णवाहिका घेऊन हजर झालेच होते. लागलीच सर्व तरुणांनी घाटातील दरीत कोसळत जखमी झालेल्या दुचाकीस्वारांना अंधारात विजेरीच्या सहाय्याने शोधून घटनास्थळावरून रस्त्यावर वाहून आणले. व तातडीने रुग्णवाहिकेतून एकास आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात तर दुसऱ्या जखमीला पुणे येथे उपचाराकामी लगोलग पाठविण्यात आले आहे. हे दोघेही सुखरूप असून बाळासाहेब शिवाजी मातेले व मयूर बाळासाहेब मातेले (रा. काळेवाडी, ता. अकोले, जि. अहमदनगर)
असे जखमी दुचाकीस्वार पिता. पुत्रांचे नाव असून या दोघांना रात्रीच्या वेळी दाट झाडीतून व काळोखात दुचाकीस्वारांना रेस्क्यू करणाऱ्या.खामुंडीतील सर्व तरुणांचे धाडस हे नक्कीच कौतुकास्पद असल्याने पंचक्रोशीत व अकोले तालुक्यातूनही त्यांचेवर अभिंदनाचा वर्षांव सुरू आहे.
बिबट प्रवरण क्षेत्रात असलेल्या बदगी घाटातील हा अपघात हृदय पिळवटून टाकणारा असून या भागात कोणत्याही क्षणी श्र्वापद हल्ला होऊ शकतो,
अशा परिस्थितीत कैलास बोडके व त्यांच्या इतर सहकार्यानी दाखवलेले प्रसंगावधान हे गौरवास पात्र आहे, कैलास बोडके व मित्रमंडळ यांनी अनेकदा नगर कल्याण महामार्गावर व बदगी च्या घाटात संकट समयी तात्काळ मदतीसाठी धाऊन जात माणुसकी जपलेली आहे हे सर्वज्ञात आहे.