जुन्नर तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच सदस्य प्रशिक्षणास राजुरी येथे सुरुवात

1 min read

राजुरी दि.११:-राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत पुणे जिल्हा परिषद, जुन्नर पंचायत समितीने नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचे दि.११ ते १३ जानेवारी कालावधीत राजुरी ग्रामपंचायत सभागृहात तीन दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले आहे. रयत शिक्षण संस्थेचे सातारच्या पंचायत राज प्रशिक्षण केंद्राकडून या प्रशिक्षणात गटविकास अधिकारी हेमंत गरिबे यांनी मार्गदर्शन केले.ग्रामपंचायतीचे कामकाज कायदेशीर असून ते करण्यासाठी कलमे, अधिकार, कामे, जबाबदारी, कर्तव्य माहिती करुन घ्या. ग्रामनिधी, वित्त आयोग निधी बरोबर स्व: उत्पन्न वाढवा. लोक सहभागातून विकासाचे नियोजन करुन चला, गावाचा सर्वांगीण लौकिक वाढवू या, असे आवाहन गटविकास अधिकारी हेमंत गरिबे यांनी या वेळी सांगितले. ग्रामपंचायत अधिनियम , उत्पन्नाचे स्त्रोत, कर आकारणी आणि वसुली याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात ग्रामपंचायत अधिनियमातील महत्त्वाची कलमे, सभा कामकाज, लेखासंहिता, अंदाजपत्रक, कर आकारणी आणि वसुली, ई पंचायत, नमुने १ ते ३३, उत्पन्नाचे स्त्रोत, शाश्वत विकासाची ध्येय, लोक सहभागातून विकास, खरेदी प्रक्रिया, पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स, गटचर्चा आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्राचार्य विजय जाधव, प्रविण प्रशिक्षक सुनिल भस्मे, सुरेंद्र चव्हाण, मयुर खळदे, दीपक बाचूरकर, अमोल जाधव आदी मार्गदर्शन करणार आहेत.या प्रशिक्षणात पिंपळवंडी, कांदळी, वडगाव आनंद, बांगरवाडी, रानमळावाडी, शिरोली तर्फे आळे, बेल्हे, गुंजाळवाडी, पिंपरी कावळ, तांबेवाडी आदी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे