खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी तिसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार

1 min read

पुणे दि.९:- माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून प्राईम पॉइंट फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा संसदरत्न पुरस्कार खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना जाहिर झाला आहे.पुरस्कार जाहीर झाल्यावर कोल्हे म्हणाले की, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या एका सामान्य घरातल्या तरुणाला आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने ज्या विश्वासाने संसदेत निवडून पाठविले, त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी काम करण्याचा मी सातत्याने प्रांजळ प्रयत्न केला आहे. या प्रयत्नांवर सलग तिसऱ्या संसदरत्न पुरस्काराने मोहोर उमटविली याचा आनंद आहे.जनतेसाठी अहोरात्र संघर्ष करण्याची भूमिका आम्ही सर्वजण घेतो. लोकहितासाठी सदैव दक्ष राहण्याचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीचा वसा आणि वारसा सोबत घेऊन संसदेची पायरी चढलो अगदी त्या दिवसापासून जबाबदारीची जाणीव सोबत आहे. या जाणिवेतूनच जेंव्हा माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज मागील अधिवेशनात उपस्थित करण्याचा प्रयत्न केला तेंव्हा मला आणि आमच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना संसदेतून निलंबित करण्यात आलं. तरीदेखील आम्ही कांदा उत्पादक आणि एकंदरीत बळीराजासाठीचा लढा थांबविला नाही. आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, लोकसभेतील गटनेत्या सुप्रियाताई सुळे यांचे मार्गदर्शन आणि आशिर्वाद सोबत आहेतच, याशिवाय मराठी स्वाभिमान व विचारांवरील निष्ठा पक्की आहे. तसेच आपल्या मतदारसंघातील मायबाप जनतेचा विश्वास पाठीशी आहेत. हे यश माझ्या मतदारसंघातील प्रत्येकाचे आहे.लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना पहिल्याच टर्म मध्ये सलग तिसऱ्यांदा संसदरत्न मिळतो याचा आनंद आहे. हा पुरस्कार काम करण्यासाठी शंभर हत्तींचं बळ देणारा, कामासाठी असीम ऊर्जा देणारा आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले. व अखंड जनसेवेचे वचन दिले होते. हे वचन पाळत मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा लहान-मोठा प्रत्येक प्रश्न सुटला पाहिजे हाच माझा सातत्याने प्रयत्न राहिला.
मला सेवेची ही संधी देणाऱ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा मी अखंड ऋणात आहे. म्हणूनच हा सलग तिसरा संसदरत्न पुरस्कार आपल्या मतदारसंघातील मायबाप जनतेला कृतज्ञतापूर्वक समर्पित करतो. जनतेचे आशीर्वाद हाच माझ्यासाठी सर्वोच्च पुरस्कार आहे !

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे