बारामती ॲग्रोवर ईडीचे छापे; सहा ठिकाणी कारवाई
1 min readबारामती दि.६:- बारामती ॲग्रोवर महाराष्ट्रातील विविध कार्यालयांवर शुक्रवारी (दि.५) सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने छापेमारी केली. यावेळी बारामती शहरातील आणखी दोन उद्योजकांवर ईडीने छापेमारी केली आहे. या ठिकाणी दोघांची चौकशी केली जात असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात विरोधकांकडून सातत्याने रोहित पवार यांच्या कारखान्याची चौकशी होणार, असे सांगितले जात होते. ही कारवाई ईडीने खरी ठरवली आहे.
सकाळी आठपासूनच ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली. दरम्यान, बारामती ग्रुपच्या मुंबई व पुणे आणि बारामतीसह सहा ठिकाणांच्या कार्यालयांवर ही छापेमारी केली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कन्नड सहकारी साखर कारखान्याबाबत ईडीकडे तक्रार केली होती. त्यावर तत्परतेने ही कारवाई झाल्याचे सांगितले जात आहे.
कारखाना लिलाव प्रक्रियेत मॅन्युप्युलेशन झाल्याचा आरोप करीत सोमय्यांनी रोहित पवारांना टार्गेट केले होते. केंद्रीय यंत्रणेने छापे मारले आणि सोमय्यांचे म्हणणे खरे ठरले आहे.
दरम्यान, बारामती शहरात बारामती ॲग्रोवर कार्यालयाखेरीज राजेंद्र इंगवले व संजय आवटे या दोघांचीही चौकशी सुरू केल्याचे सांगितले जात आहे.
“हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा. ज्यांनी पिढ्यान्पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला. अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल.”
रोहित पवार, आमदार