श्री क्षेत्र आणे येथे १२ व १३ जानेवारी रोजी आमटी-भाकरीचा महाप्रसाद; यंदा भाविकांसाठी ४० कढाया आमटी
1 min readआणे दि.१:- श्रीरंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी सोहळा श्री क्षेत्र आणे (ता. जुन्नर) येथे शुक्रवार (दि.५) पासून सुरू होत आहे. यावर्षी आलेल्या भाविकांना 40 कढाया आमटी केली जाणार आहे. शुक्रवारी पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. देवस्थानचे अध्यक्ष मधुकर दाते यांनी ही माहिती दिली.
यावर्षी संपूर्ण सप्ताहाच्या अन्नदानाचा खर्च मातोश्री मीराताई लक्ष्मण आहेर यांच्या ६५ व्या व लक्ष्मण धोंडीबा आहेर (गुरुजी) यांच्या ७५ व्या अभिष्टिंतन सोहळ्या निमित्त गावच्या माजी सरपंच डॉ. श्वेतांबरी दिपक आहेर, डॉ. दिपक लक्ष्मण आहेर, शितल किरण आहेर, किरण लक्ष्मण आहेर, अर्णव दीपक आहेर, विराज किरण आहेर, विवांश किरण आहेर परिवारातर्फे सप्ताह महाप्रसाद व यात्रा महोत्सव संपूर्ण खर्च केला जाणार आहे.
श्रींच्या महाआरती चे मानकरी व आमटी महाप्रसादाचे दानशूर अन्नदाते रामदास गुंजाळ (गुंजाळवाडी), कै.बाळाजी आहेर यांच्या स्मरणार्थ धोंडीभाऊ आहेर, निवृत्त आहेर व परिवार, कै.दत्तू आहेर यांच्या स्मरणार्थ सुमन आहेर व तुकाराम आहेर,
सुषमा हाडवळे (राजुरी) व परिवार, कै.सुधाकर नांगरे यांच्या स्मरणार्थ सुहास व महेश नांगरे, वंदना उनकुले व परिवार, कै. पांडुरंग आहेर यांच्या स्मरनार्थ चंद्रभागा आहेर, विकास आहेर व परिवार हे आहेत.
येथील यात्रा उत्सवात दरवर्षी लाखो भाविक येत दर्शनासाठी येत असतात. यावर्षी आलेल्या भाविकांना देवस्थाने वेगळा उपक्रम राबवला असून काही ठिकाणी आमटीचे घरी ही वाटप करण्यात येणार आहे. देवस्थानला ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळाला असून श्रीरंगदास स्वामी पुण्यतिथीनिमित्त गेल्या १३६ वर्षांपासून हरिनाम सप्ताह आयोजित केला जात आहे.
या वेळी आमटी-भाकरीचा महाप्रसाद केला जातो. हजारो किलो भाकरी येत असतात आलेल्या भाकरीचे वाजत गाजत स्वागत केलं जातं. याचा लाभ दोन दिवसांत लाखो भाविक घेत असतात. शुक्रवारी सकाळी महापूजा व वीणापूजनाने होणार आहे. सकाळी काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी प्रवचन, हरिपाठ, कीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत.
सोपान महाराज सानप, कान्होबा महाराज देहूकर, विशाल महाराज खोले, बाळू महाराज गिरगावकर, पुरुषोत्तम महाराज पाटील, संतचरणरज वसंतगडकर, रामभाऊ महाराज राऊत यांचे या काळात कीर्तन होणार आहे.
शुक्रवारी (दि. १२) सकाळी भजन, श्री स्वामींच्या शाळिग्रामची मिरवणूक व महाआरती होणार आहे. त्यानंतर भाविकांना आमटी-भाकरीचा महाप्रसाद दिला जाणार आहे. सायंकाळी समाधान महाराज भोजेकर यांचे कीर्तन होईल. शनिवारी (दि. १३) योगिराज महाराज गोसावी यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
या निमित्त बुधवार (दि. १०) पासून दोन दिवस भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याचे देवस्थान उपाध्यक्ष अनिल आहेर, उपसरपंच सुहास आहेर यांनी सांगितले. प्रथम तीन क्रमांकातील बैलगाड्यांना १ लाख ९५ हजार रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
तीनही क्रमांकातील फळीफोड गाड्यांना, आकर्षक फायनल, घाटाचा राजा या बैलगाड्यांस रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. रविवारी (दि. ७) श्रीरंगदास स्वामी मंदिराजवळ बैलगाडा शर्यत टोकन लकी ड्रॉ पद्धतीने काढले जाणार आहे.