आळेफाटा पोलिसांचा वर्षभरात वाहन चालकांना ३८.३३ लाखांचा दंड; ७ हजार ४३७ वाहनांवर कारवाई
1 min readआळेफाटा दि.२६:- १ जानेवारी २०२३ ते २५ डिसेंबर २०२३ या कालावधीत वाहतूक नियमांना पाठ दाखविणाऱ्या ७ हजार ४३७ वाहन चालकांवर मोटार वाहन अधिनियमाच्या विविध कलमांन्वये कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल ३८.३३ लाखांचा दंड आळेफाटा पोलिसांनी वसूल केला आहे. ही कारवाई आळेफाटा वाहतूक पोलिसांनी केली असून, त्यांच्याकडून सध्या हेल्मेट सक्तीकरिता विशेष प्रयत्न केले जात आहेत. या कारवाईत चारचाकी वाहनात सीटबेल्ट न वापरणाऱ्या चालकांची सर्वात जास्त संख्या आहे. वर्षभरात मालवाहतूक वाहनात प्रवाशांची वाहतूक करताना आढळून आल्याने ५०४ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३ लाख १६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ट्रिपल सीट प्रवास करताना आढळून आल्याने ८५६ वाहनचालकांकडून ८५ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त चारचाकी वाहनात सीट बेल्ट न वापरणाऱ्या २ हजार ५३६ वाहन चालकांकडून ५ लाख ५० हजार रुपये, ५३६ वाहनचालकांनी त्यांची वाहने धोकादायकरीत्या रोडवर उभी केल्याने त्यांना ३२ हजार ६०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ब्लॅक काच असणाऱ्या १४१ वाहनांवर कारवाई करीत १ लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लायसन्स जवळ न बाळगणाऱ्यावरही कारवाई लायसन्स जवळ न बाळगणाऱ्या ८७८ वाहनचालकांकडून ४ लाख ७५ हजार दंड वसूल करण्यात आला आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या १८० वाहन चालकांविरुद्ध तसेच धोकादायकरीत्या रोडवर वाहन लावणाऱ्यांवर २०० गुन्हे दाखल केले आहेत. आळेफाटा पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी ७ हजार ४३७ वाहन चालकांना ३८.३३ लाखांचा दंड वसूल केला आहे.