संत निरंकारी मिशन आयोजित रक्तदान शिबिरात १३० जणांनी केले रक्तदान
1 min read
आळेफाटा दि.१८:- निरंकारी ‘सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज’ यांच्या कृपाशीर्वादाने संत निरंकारी मिशन ची सामाजिक शाखा ‘संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन’च्या वतीने आळेफाटा येथे रविवार, दि. १७ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. १३० निरंकारी भक्तांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले. संत निरंकारी रक्तपेढी, विलेपार्ले (मुंबई) यांनी हे रक्त संकलन करण्याचे कार्य केले.या शिबिराचे उदघाटन पिंपळवंडी गावचे प्रथम नागरिक तथा ग्रामपंचायत सरपंच मेघा काकडे व विघ्नहर सहकारी साखर कारखाना संचालक विवेक काकडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी मिशनचे आळेफाटा विभाग प्रमुख चंद्रकांत कुऱ्हाडे सह अनेक जण आवर्जून उपस्थित होते.
उदघाटन प्रसंगी मिशनची माहिती देताना कुऱ्हाडे म्हणाले कि, संत निरंकारी मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे नोव्हेंबर, १९८६ मध्ये संत निरंकारी समागमामध्ये करण्यात आले होते. निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’.
संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात ‘सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज’ यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे. दरम्यान जुन्नर विधानसभेचे माजी आमदार शरद सोनवणे, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे सह आळेफाटा विभागातील अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती, समाजसेवकांनी शिबिराला सदिच्छा भेट देऊन मिशनच्या कार्याचे कौतुक केले.
गेल्या १५ दिवसांपासून समाजामध्ये रक्तदानाविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी मिशनच्या सेवादारांनी आळेफाटा, ओतूर, उंब्रज, पिंपळवंडी सह बाजूच्या गावांमध्ये रॅलीच्या माध्यमातून तसेच घराघरामध्ये जाऊन जनजागृती केली. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशनचे अनुयायी यांचे योगदान लाभले. आलेल्या सर्व रक्तदात्यांचे आणि मान्यवरांचे आभार सेवादल युनिट १३३६ चे संचालक संतोष कुऱ्हाडे यांनी मानले.