जुन्नर तालुक्यात अपघाताची घटना दु:खद; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मृत प्रवाशांना श्रद्धांजली
1 min read
नागपूर दि.१८ :- अहमदनगर-कल्याण महामार्गावर जून्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ ट्रक, पिकअप टेम्पो आणि रिक्षा यांची धडक होऊन झालेल्या अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मृत्यू पावलेल्या प्रवाशांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली असून मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केल्या आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, डिंगोरे गावाच्या परिसरातील अंजीराची बाग नावाच्या भागाजवळ रविवारी (दि. १७) रात्री सडे दहाच्या सुमारास झालेल्या अपघातामुळे आठ जणांना आपले प्राण गमवावे लागले.
यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सतर्क राहून कर्तव्य बजावावे तसेच वाहनचालकांनी सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. ओतूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन बचाव, मदतकार्य सुरु केल्याची माहितीही त्यांनी दिली.