१७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा अखेर संप मागे; मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर ताेडगा
1 min readमुंबई दि.१४:-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात जुन्या पेन्शन संदर्भात निवेदन मांडल्यानंतर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप अखेर मागे घेतला आहे. जुन्या पेन्शन योजनेसह विविध १८ मागण्यांसह राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.
राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनी सेवा निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यावर अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले असून मुख्य सचिवांमार्फत त्याबाबतचे मत शासनाला सादर करण्यात येईल.
निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल.
त्यामुळे या अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल, अशी ग्वाही देतानाच अधिकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केले. त्यानंतर संप मागे घेण्यात आला आहे.