नळवणेतील श्री कुलस्वामी खंडेराया देवस्थानचा चंपाषष्ठी सोहळा सोमवारी
1 min readआणे दि.१३ :- महाराष्ट्राचे कुलदैवत, नळवणे (ता.जुन्नर) गावचे ग्रामदैवत श्री कुलस्वामी खंडेराया मंदिर जीर्णोद्धार व कलशारोहन सोहळा व १७ वा वर्धापन दिन तथा चंपाषष्ठी सोहळा सोमवार दि. १८ रोजी भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होणार आहे. त्या निमित्ताने दरवर्षी श्री च्या दर्शनासाठी व कुलदैवताचा कुलाचार करण्यासाठी असंख्य भाविक महाराष्ट्रातुन येणार आहेत.
त्या निमित्ताने श्री मंगलस्नान, श्री महाअभिषेक, भव्य पालखी मिरवणूक, महाआरती, जागरण, महाप्रसाद व रात्री किर्तन, शोभेची दारू इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब गगे यांनी दिली. देवस्थानने व ग्रामस्थांनी यात्रा महोत्सवाचे भाविकांसाठी सर्व सोयीसुविधा, सुरक्षा व्यवस्था, पार्किंग व्यवस्था इत्यादीचे नियोजन केले असून भाविकांनी श्री च्या मंदिर परिसरात नियमांचे पालन करण्याचे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील कल्याण-अहमदनगर महामार्गापासून अंदाजे चार- पाच कि.मी.वर नळवणे गावालगतच्या डोंगरावर असणारे
तीनशे ते साडेतीनशे वर्षे पुरातन श्री कुलस्वामी खंडेरायाचे मंदिराचा परिसर अतिशय नयनरम्य, आल्हाददायक व निसर्गसौंदयनि नटलेला असून या ठिकाणी अनेक पर्यटक भेटी देत आहेत. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब गगे यांनी दिलेल्या माहितीनुसार,
नळदुर्ग येथून श्री खंडोबादेव विवाह समारंभानंतर जेजुरी येथे जात असताना नळवणे (ता.जुन्नर) येथील डोंगरावर काही काळ विश्रांती घेतली असता त्या ठिकाणी स्वयंभू शिवलिंग व नागदेव प्रगट झाले.
त्यानंतर साधारणतः १६४० च्या दरम्यान या स्वयंभू शिवलिंगाजवळ ग्रामस्थांनी खंडोबासह म्हाळसाई व बाणाई यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून मंदिर उभारले, श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्ट, नळवणे या नावाने नोंदणी झाली आहे.त्या माध्यमातून मंदिर परिसराचे नियोजन सुयोग्यपणे चालू असून हे देवस्थान एक आकर्षक मॉडेल तयार झाले आहे.
उंच डोंगरावर पिण्याच्या पाण्याची बारमाही व्यवस्था, मंदिरासमोरील हिरवळीचा गालिचा, निरनिराळ्या रंगांची फुलझाडे, आकर्षक आकार दिलेली शोभेची झाडे, बगीचा, लॉन, डोंगरावरून दिसणारा आजूबाजूचा मनमोहक परिसर तसेच जलसंधारणाच्या पाण्यामुळे जिवंत झालेले शिवार पाहून येथे येणारा शिवभक्त मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहत नाही.