महिलांचे सबलीकरण होणे काळाची गरज- प्रा अर्चना अवताडे
1 min readनिमगाव सावा दि.१०:- महिला ह्या अबाला नसून सबला आहे. प्राचीन काळी स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जात होते.पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये महिलांना मानसन्मान दिला जात नव्हता.त्यामुळे स्त्रीया अनेक बाबतीत मागे होत्या. परंतु आजकाल त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने कार्यरत आहेत.
स्त्रियांनी शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या सक्षम झाले पाहिजे. कोणत्याही कठीण प्रसंगाला न डगमागता धैर्याने तोंड दिले पाहिजे. कोपर्डी, निर्भया यासारखी प्रकरणे घडत असताना भारतातील स्त्री खरच सुरक्षित आहे काय? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे स्त्रियांनी स्वयंरक्षणासाठी तयार असले पाहिजे.
महिलांबाबत असलेल्या कायद्यांचे ज्ञान त्यांना असावे. आपले कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध करण्याची जिद्द आणि चिकाटी महिलांनी स्वतःमध्ये ठेवावी. आपल्या कुटुंबाबरोबर इतरही जबाबदाऱ्या पेलावण्यासाठी महिलांनी सबल होणे ही काळाची गरज असल्याचे मत बी.डी.काळे महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अर्चना अवताडे यांनी मांडले.
श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगाव सावा, ता. जुन्नर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आजीवन अध्ययन व ज्ञानविस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला सबलीकरण या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या एक दिवशीय कार्यशाळेमध्ये महिला सबलीकरण काळाची गरज या विषयावर प्रा. अर्चना अवताडे, तसेच आधुनिकता व आजची स्त्री या विषयावर प्रा. प्रल्हाद शिंदे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. अध्यक्ष मनोगतामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. छाया जाधव यांनी स्त्रियांनी निर्भय बनून समाजामध्ये पुरुषाच्या बरोबरीने कार्य केले पाहिजे, समाजाने सुद्धा स्त्रीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल करावा. तरच खऱ्या अर्थाने स्त्रियांचे सबलीकरण शक्य असल्याचे सांगितले.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. छाया जाधव, प्रा.प्रकाश कांबळे, प्रा.अनिल पडवळ, प्रा.सुभाष घोडे, प्रा.प्रवीण गोरडे, प्रा.माधुरी भोर, प्रा.शेख मॅडम, प्रा.पूजा चिंचवडे प्रा. नीलम गायकवाड आणि विद्यार्थी उपस्थित होते. या एक दिवशी कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.नंदा आहेर, प्रास्ताविक आजीवन अध्ययन व ज्ञानविस्तार विभागाच्या विभाग प्रमुख प्रा.प्रियंका डुकरे आणि प्रा राहुल सरोदे यांनी आभार मानले.