नळवणे येथे रस्त्याअभावी शासनाचा १३ लाख रुपयांचा निधी पाण्यात

1 min read

नळवणे दि.७:- नळवणे (ता.जुन्नर) येथील खबडाई साठवण बंधारा महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार योजने अंतर्गत सन २०१७ साली बांधण्यात आला असून बंधाऱ्याच्या पश्चिमेकडील शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी पर्यायी रस्त्याची सोय न केल्यामुळे आजपर्यंत या साठवून बंधाऱ्यात पाणीसाठा करता आला नाही.

त्यामुळे ज्या उद्देशाने हा बंधारा बांधला त्याचा कोणताही फायदा परिसरातील शेतकऱ्यांना झालेला नाही. बंधारा बांधताना पर्यायी रस्त्यासाठी बाजूच्या शेतकऱ्यांनी संमती दिलेली असून रस्ता तयार करून पाणीसाठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी अनेक वेळा केलेली आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभागाअंतर्गत १३ लाख २९ हजार रुपये खर्च करून खबडाईत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात पाणी साठल्याने येथून असणारा रस्ता बंद होत आहे.

त्यामुळे निमदरा, शेेलपाटी, चिंचमाळी, चढे पठार, पळसठिका या ठिकाणचे दळणवळण बंद होत आहे. या ठिकाणी बंधारा बांधण्यासाठी शेतकऱ्यांनी आधीच विरोध केला होता परंतु येथून रस्ता काढून देणार असल्याचे शेतकऱ्यांना अस्वासन देण्यात आले होते.

ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे संबंधित कामासाठी निधी उपलब्ध झालेला नाही. जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना ये -जा करण्यासाठी या बंधाऱ्यातून जावे लागते. त्यामुळे पाणीसाठा करता येत नाही.

ऐन दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या पठार भागातील शेतकऱ्यांसाठी हेच साठवण बंधारे वरदान ठरत असताना आपल्या शेता शेजारील बंधाऱ्यातून पाणी डोळ्यादेखत वाहुन जात असल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

शासनाने लवकरात लवकर या रस्त्यासाठी नीधी उपलब्ध करून द्यावा व बंधाऱ्यात पाणीसाठा करावा अशी मागणी शेतकरी संतोष शिंदे, गुलाब शिंदे, संभाजी देशमुख, कुलकर्णी काका, तुकाराम साबळे, खंडू शिंदे , शंकर शिंदे यांनी केली आहे.

रस्त्यासाठी येथील शेतकऱ्यांनी संमतीपत्र ही दिले आहेत. तरी रस्त्याला किंवा पुलाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.

सबंधित शेतकऱ्यांची संमती असेल तर आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून त्यावर साकव प्रोग्राम पूल मध्ये समावेश करता येईल. इथे पुलही होईल व दळवळणाचा रस्ताही होईल. माझा यासाठी सतत पाठुरावा सुरू आहे.”

पांडुरंग पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे