पहाटेच्या धुक्यामुळे पुणे – नाशिक महामार्गावर अपघात; तिघांचा मृत्यू तर पाच जण जखमी

मंचर दि.२ – पुणे नाशिक महामार्गावर एकलहरे – मंचर (ता. आंबेगाव) येथे क्रुझर जीप आणि मालवाहतूक टेम्पो यांचा अपघात होऊन जीपमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१) सकाळी ६ वाजता घडली.

अपघातात मृत्यू झालेले आणि जखमी झालेले सर्वजण जायखेडा (ता. सटाणा, जिल्हा नाशिक) येथील असून जखमींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचार चालू आहेत.

अपघाताचे कारण पहाटेच्या वेळी पडलेले धुके असल्याचे सांगण्यात आले. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जा येथून भोसरी येथे कार्यक्रमासाठी क्रुझर जीप (एमएच १९ वाय ६३०१) कळंब येथून एकलहरे मंचरच्या दिशेने जात होती.

या गाडीसमोर मालवाहतूक टेम्पो (एमएच २८ एबी ७५६४) हा चालला असताना अचानक टेम्पोवाल्यापुढे काहीतरी असल्यामुळं ब्रेक दाबला. पहाटेच्या वेळी असलेल्या धुक्यामुळे मालवाहू टेम्पोच्या मागे असलेल्या जीप चालकाने टेम्पोला मागून धडक दिली.

या अपघातात जीप मधील शांताराम संभाजी अहिरे (वय ५१), मधुकर तुकाराम अहिरे (वय ५५) आणि जीप चालक पंकज खंडू जगताप (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाल आहे, तर सुभाष तुकाराम अहिरे (वय ६५), सुशीला सुभाष अहिरे (वय ६०), कमलाकर सुभाष अहिरे (वय ४५),

मनोहर अशोक अहिरे (वय ३८, सर्व रा. जायखेडा, ता. सटाणा, जिल्हा नाशिक) आणि जिजाभाऊ रामभाऊ शेवाळे (वय ५८, रा. लोणेर ता. देवळा, जिल्हा नाशिक) हे जखमी झाले आहेत. पहाटेच्या वेळी धुके असल्याने दोन्ही वाहन चालकांना अंदाज न आल्यामुळे अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे.

या घटनेच्या अपघात तपासामध्ये टेम्पो चालक आरिफ अस्मद शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची फिर्याद जीपमधील जखमी मनोहर आहिरे यांनी दिली आहे. पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे