कुकडी नदीत बुडून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू

कुरण दि.३० – कुरण (ता. जुन्नर) येथील संस्कार अंकुश तळेकर (वय १४) या अल्पवयीन मुलाचा कुकडी नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. नारायणगाव येथील रा.प. सबनीस विद्यालयात तो इयत्ता ९ च्या वर्गात शिकत होता.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार संस्कार त्याच्या मित्रा सोबत मंगळवारी (दि. २८) सायंकाळच्या वेळी धालेवाडी तर्फे हवेली येथील नदीत पोहण्यासाठी गेला होता. कुकडी नदीवरिल येडगाव जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेला असल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणीसाठा आहे.
येथील नदीपात्रात मुलगा बुडाल्याचे माहिती पोलिसांना समजताच त्यांनी बचाव पथकाच्या व स्थानिक नागरिकांच्या मदतीने रात्री उशीरापर्यंत शोधकार्य सुरू केले;
परंतु रात्रीचा अंधार आणि खोल पाण्याने अडचणी येत असल्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली होती. शेवटी बुधवारी (दि.२९) सकाळी संस्कारचा मृतदेह शोधण्यात यश आले.