जनता दरबारामुळे १२७ नागरिकांची कामे मार्गी लागणार

पारनेर दि.८: आमदार नीलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये पार पडलेल्या जनता दरबारात १२७ तक्रारी दाखल झाल्या. त्यावर चर्चा करण्यात येउन ही कामे मार्गी लावण्यात येतील अशी ग्वाही विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दाखल तक्रारींपैकी काही तक्रारींवर तात्काळ निर्णयदेखील देण्यात आले.


महसूल, महावितरण, रोजगार हमी योजनेचे अनुदान, कृषी विभाग, आदींबाबात तालुक्याच्या विविध भागांमधील नागरिकांना मंगळवारी तक्रारी दाखल केल्या. त्याबाबत आ. लंके यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे त्या त्या व्यक्तींच्या कामांना होत असलेल्या विलंबाबात विचारणा केली. एकाही व्यक्तीचे काम प्रलंबित राहणार नाही याची काळजी घ्या व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सुचना आ. लंके यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.


अपंग बांधवांच्या अपंग प्रमाणपत्रासंदर्भात यापूर्वी आ. लंके यांच्या पुढाकारातून पारनेर येथील ग्रामीण रूग्णालयात विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी सबंधित अपंगांची तपासणी करून नोंदी घेतल्या होत्या. त्यापैकी ५५९ अपंगांची प्रमाणपत्र आरोग्य विभागाने तयार केली. त्याचे वितरण यावेळी आ. लंके यांच्या हस्ते करण्यात आले.

नीलेश लंके अपंग कल्याणकारी सेवाभावी संस्थेेचे सुनील करंजुले व सुनिता करंजुले यांनी अपंग बांधवांच्या या प्रमाणपत्रांसाठी विशेष परिश्रम घेतल्याचे आ. लंके यांनी यावेळी आवर्जुन सांगितले. यावेळी बोलताना आ. लंके यांनी सांगितले की, विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये दरमहा जनता दरबाराचे आयोजन करण्यात आल्यामुळे नागरिकांची विविध कामे एकाच वेळी व एकाच ठिकाणी मार्गी लावण्यात यश येते.

आपण आमदार झाल्यानंतर लगेच जनता दरबार सुरू करून नागरीकांचे विविध प्रश्‍न मार्गी लावण्यास प्राधान्य दिले होते. मात्र त्यानंतर कोरोना महामारीमुळे जनता दरबार बोलविणे शक्य झाले नाही. त्यानंतरही या ना त्या कारणामुळे दरबार होउ शकला नाही. आता दरमहा जनता दरबाराचे आयोजन करण्यात येउन पूर्वीप्रमाणेच तालुक्यातील जनतेचे विविध प्रश्‍न मार्गी लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी तहसिलदार गायत्री सैंदाणे, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, यांच्यासह कृषी, महावितरण, पंचायत समिती, आरोग्य विभागासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नगराध्यक्ष नितीन आडसूळ, अर्जुन भालेकर, डॉ. बाळासाहेब कावरे, योगेश मते, भूषण शेलार, संदीप चौधरी, अ‍ॅड. राहुल झावरे, रविंद्र राजदेव, विजय डोळ, रायभान औटी, चंद्रभान ठुबे, बाळासाहेब खिलारी, अभयसिंह नांगरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कृषि विभागामार्फत वितरीत करण्यात येणारे गोपीनाथ मुंडे अपघात अनुदानाच्या धनादेशाचे आ. नीलेश लंके यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनो प्रत्येकी दिड लाखांची मदत देण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे