उपसा सिंचन योजनेसाठी आणे पठारावरील शेतकरी पुन्हा आक्रमक
आणे दि.३० : यावर्षी आणे पठारावर पाण्याची परिस्थिती गंभीर असून कुकडी प्रकल्पातून उपसा जलसिंचन योजना राबवण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आणे पठार भागात ८ ते ९ हजार हेक्टर पेक्षा जास्त जमीन असून शेतीसाठी कुकडी प्रकल्पातून उपसा जलसिंचन योजना राबविण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची आग्रही मागणी आहे.असून लोकप्रतिनिधींनी आता तरी पुढाकार घेऊन पाणीप्रश्न प्राधान्याने मार्गी लावावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी की, आणे (ता. जुन्नर) पठारावरील शेतीला उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी मिळावे अशी मागणी आणे पठारावरील शेतकरी अनेक वर्षांपासून करीत आहेत. परंतु शासनाचा या मागणीला योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी आणे पठार विकास संस्थेच्या माध्यमातून रविवार दि.२९ रोजी झालेल्या बैठकीत आंदोलनाचा इशारा दिला आहे.आणे येथील श्रीरंगदास स्वामी महाराज मंदिरात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. पठारावरील आणे, नळवणें, शिंदेवाडी, पेमदरा व आनंदवाडी येथील शेतकऱ्यांची पाणी प्रश्नाबाबत आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत १६ नोव्हेंबर पासून धरणे आंदोलन सुरू करण्याचा ठराव संमत करण्यात आला. धरणे आंदोलनात शासनाचा योग्य प्रतिसाद न मिळाल्यास आमरण उपोषणाला बसण्याची तयारीही या सभेत शेतकऱ्यांनी दर्शविली.या सभेत संपूर्ण आणे पठारावर उपसा सिंचन योजना राबविण्यासाठी ठराव संमत करून सह्यांचे निवेदन तयार करण्यात आले. यावेळी आणे पठारावरील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. आणे पठारावरील शेती समृध्द करण्यासाठी नवीन सुप्रमा (सुधारित प्रशासकीय मान्यता ) मध्ये आणे पठाराचा समावेश करून लवकरात लवकर उपसा सिंचन योजना राबवावी. तसेच जोपर्यंत आणे पठारावर पाणी येत नाही तोपर्यंत पारनेर तालुक्याला लागू असलेल्या सर्व योजना, सुविधा व सवलती आणे पठाराला लागू करण्यात याव्यात. कारण आणे पठार जरी सुजलाम सुफलाम अशा जुन्नर तालुक्यात असला तरी येथील भौगोलिक परिस्थिती पारनेर तालुक्यासारखीच आहे. असे देवस्थान संस्थेचे माजी अध्यक्ष विनायक आहेर यांनी सांगितले. यावेळी पेमदरा गावचे उपसरपंच व भारतीय किसान संघाचे जुन्नर तालुका प्रमुख बाळासाहेब दाते,शिंदेवाडीचे माजी सरपंच एम. डी. पाटील, आणे गावच्या सरपंच प्रियांका दाते, पेमदरा गावचे माजी सरपंच विठ्ठल बेलकर, देवस्थान संस्थेचे अध्यक्ष व पठार विकास संस्थेचे कार्याध्यक्ष मधुकर दाते, मुक्ता दाते, विजयकुमार आहेर, जयराम दाते यांनी आपले विचार मांडले. सभेचे सूत्रसंचालन तुषार आहेर यांनी केले.“१६ नोव्हेंबर पासून आणे पठारावरील सर्व शेतकरी व व्यावसायिकांना सोबत घेऊन धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल. या आंदोलनास शासनाचा योग्य प्रतिसाद न मिळाल्यास मी स्वतः आमरण उपोषणाला बसणार आहे.”
– मधुकर दाते, कार्याध्यक्ष, आणे पठार विकास संस्था –
“आणे पठारावरील सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपले राजकीय व वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेऊन या आंदोलनात सहभागी झाले पाहिजे.”
– बाळासाहेब दाते,भारतीय किसान संघ, जुन्नर तालुका प्रमुख,[ धरण उशाला कोरड घशाला
जुन्नर तालुक्यात पाच धरण असून तालुक्यातील सर्व जनतेला पाणी मिळत नाही.
तर कुकडी प्रकल्पातून नगरच्या पारनेर, श्रीगोंदा जामखेडपर्यंत जनतेची तहान भागविली जात असून, शेतजमिनीही ओलिताखाली आल्या आहेत. मात्र, आणे पठार भागाला कुकडी प्रकल्पातून शेतीच्या पाण्यासाठी वंचित ठेऊन दुजा भावाची वागणूक मिळत असल्याची नागरिकांची भावना आहे.]