पावसा अभावी जुन्नर तालुक्यात सोयाबीन उत्पादनात मोठी घट

1 min read

आळेफाटा दि.२६:- जुन्नर तालुक्यात सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात आली आहे.यंदा पावसाच्या खंडामुळे उत्पादकता घटलीय. त्यात येलो मॉझेक या रोगाने सोयाबीनचे अर्धे नुकसान केल. एकरी आठ ते नऊ क्विंटल सोयाबीन उत्पादन अपेक्षित होते पण चार ते पाच क्विंटलचा उतारा हाती आला. या बाजार भावात सोयाबीनचा उत्पादन खर्च पण निघत नाही.

रब्बी हंगामात पिकांची पेरणी करायची की लेकराबाळाच्या शिक्षणाला पैसे लावायचे हाच प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. सणासुदीचे दिवस आहेत काही गोडधोड कराव लागेल त्यासाठी जुळवाजुळव करायच बघाव लागेल. रब्बीच्या पेरणीसाठी तर उसनवारी केल्याशिवाय पर्याय नाही. अशी माहिती शेतकरी शिवाजी दाते यांनी दिली.

सोयाबीन पीक काढणी होईपर्यंत चार महिने लागतात. चार महिने कष्ट करून जर एक रुपया शिल्लक राहत नसेल तर शेती करावी की सोडून द्यावी हा प्रश्न पडतो त्यामुळे शेतकरी सुखी आहे मजेत आहे अस ज्यांना वाटत त्यांना हा हिशोब कधीतरी आवर्जून सांगायला हवा.

ही रिस्क घेऊन शेतकरी दरवर्षी मेहनत करतो पण सरकारच्या धोरणामुळे आमच्या वाट्याला फक्त फुफाटा येतो. सोयाबीनची माती करणारे धोरण केंद्र सरकारने हाताशी धरले आहे. देशात मागच्या दोन वर्षांपासून पामतेल आयातीचा ओघ सुरूच आहे त्याचा फटका सोयाबीन उत्पादकांना बसतोय.

ऐन आवकेच्या हंगामात हमीभावाच्या खाली सोयाबीनचे भाव आलेत. त्यातून उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणि मिळणाऱ्या भावाच गणित जुळत नाही.

जुन्नर तालुक्यात १३ हजार २१७ हेक्टरवर सोयाबीनचे पीक असून शेंगा भरणीच्या वेळी पाऊस नसल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली आहे.”

गणेश भोसले, कृषी अधिकारी जुन्नर

” राज्यातले सोयाबीन उत्पादक शेतकरी हैराण झालेत. विविध भागातील शेतकऱ्यांची पोर रस्त्यावर उतरलेत स्थानिक नेत्यांना निवेदन देत आहेत. हे चित्र आशावादी आहे सरकार निवडणुकांसाठी शेतमालाचे भाव पाडायला लागलय. आता शेतकऱ्यांना लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारावे लागतील. अन्यथा असाच मातीमोल बाजारभाव मिळत राहिला तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही.”

 ज्ञानेश्वर संभेराव, सोयाबीन उत्पादक शेतकरी, आणे

एकरी नांगरणीचा खर्च तीन हजार रुपये, फनपाळी दीड हजार रुपये, पेरणी दीड हजार रुपये, सोयाबीन बियाण्याची वीस किलोची पिशवी दोन हजार रुपये, खत दीड हजार रुपये, फवारणी तीन हजार रुपये, शेणखत सहा हजार रुपये, कापणी पाच हजार रुपये, मळणी तीन हजार रुपये असा एकूण पंचवीस हजार पाचशे रुपये प्रति एकर खर्च येतो.जर एकरी पाच क्विंटल सोयाबीनचे उत्पादन हाती आले तर सद्याच्या चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार भावाप्रमाणे शेतकऱ्याच्या हातात बावीस हजार पाचशे रुपये पडतात म्हणजे भांडवल पण पदरमोड करून घालावे लागते”.

 संतोष आग्रे , सोयाबीन उत्पादक शेतकरी गुळंचवाडी

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे