रेव्हेन्यू अपिलाचे कामकाज आता पारनेरमध्येच; आमदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्यास यश
1 min readपारनेर दि.१८:- विविध महसूल विवादावर तहसिलदारांनी दिलेल्या निर्णयावर प्रांताधिकारी कार्यालयाकडे अपिल केल्यानंतर त्यासाठी नागरीकांना नगर येथे हेलपाटे मारावे लागत. इतर तालुक्यात तालुक्याच्या ठिकाणीच हे काम होत असताना पारनेरचे कामकाज मात्र नगर येथे होत होते. त्यावर आ. नीलेश लंके यांनी आक्षेप घेत माझ्या जनतेची ससेहोलपट नको अशी भूमिका घेत हे कामकाज पारनेर येथच सुरू करण्यासंदर्भात राज्य लोकसेवा हक्क आयोगाकडे दाद मागितली होती. त्यानंतर आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मंगळवारपासून पारनेर येथे अपिलाचे कामकाज सुरू झाले.
तहसिलदरांपुढे रस्ता केस, फेरफार नोंदी, वारस नोंदी, मृत्यू पत्र, खरेदी खतासंदर्भात विवाद गेल्यानंतर त्यावर देण्यात आलेल्या निकालावर प्रांताधिकारी कार्यालयाकडे अपिल करावे लागते. पारनेर-नगर तालुक्यासाठी नगर येथे प्रांताधिकारी कार्यालय असून अपिलीय कामकाज नगर येथे करण्यात येत होते. मात्र श्रीगोंदे तालुक्यातील अपील यापूर्वी श्रीगोंदे येथे घेण्यात येते आहे.
प्रांताधिकारी तसेच त्यांचे क्लार्क हे महिन्यातून एकदा किंवा दोनदा श्रीगोंदे येथे जाऊन हे कामकाज करतात. इतर तालुक्यांमध्येही त्याच तालुक्यात अपिलाचे कामकाज सुरू आहे. पारनेर तालुक्यासाठी वेगळा न्याय दिला जात असल्याने पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडेही नागरिकांना तक्रारी केल्या होत्या. मंत्री विखे यांनीही त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित केले होते. मात्र मंत्री विखे यांच्या आदेशाकडेही दुर्लक्ष करण्यात आले होते. जिल्हाधिकारी यांना आदेश करण्यात येऊनही निर्णय होत नसल्याने पारनेर बार असोसिएशनने आमदार नीलेश लंके यांच्याकडे या प्रश्नी तोडगा काढण्याचे साकडे घातले होते. आ. नीलेश लंके यांनी दि.१४ फेबु्रवारी रोजी जिल्हाधिकारी तसेच राज्य लोकसेवा हक्क आयोगाकडे त्यासंदर्भात पत्र व्यवहार केला होता.आ. लंके यांच्या पत्रव्यवहारानंतर लंके यांनी प्रांताधिकारी गणेश राठोड यांची भेट घेऊन इतर तालुक्यांप्रमाणे पारनेर येथेच कामकाज करण्याची मागणी केली. पारनेर तालुका हा भौगोलिक दृष्टया मोठा तसेच दुष्काळग्रस्त असल्याने नागरीकांना नगरला हेलपाटे मारणे आर्थिक दृष्टया परवडत नसल्याने हे कामकाज पारनेर येथेच सुरू करावे असे सुचित केले होते. त्याची दखल घेण्यात येउन अखेर पारनेर येथे मंगळवारपासून कामकाज सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान बार असोसिएशनच्या वतीने प्रांताधिकारी गणेश राठोड यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.इतर तालुक्यांमध्ये अपिलीय कामकाज सुरू झालेले असताना पारनेरचे कामकाज नगर येथेच सुरू ठेवण्यासाठी पारनेर तहसिल कार्यालय व प्रांत कार्यालयातील काही झारीतील शुक्राचार्य आटापिटा करीत होते. काही ना काही आडकाठी आणून पारनेरचा निर्णय होउच नये यासाठी विविध क्लुप्त्या लढविल्या जात होत्या.
नगरच्या बार असोसिएशनलाही त्यात ओढण्यात आले, त्यांचा पारनेरला कामकाज करण्यास विरोध असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र पारनेर तालुक्यातील नागरीकांच्या कामासाठी नगरच्या बार असोसिएशनचा हट्ट असण्याचे काहीच कारण नसल्याने झारीतील शुक्राचाऱ्यांचा आटापिटा व्यर्थ ठरला. वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले हे झारीतील शुक्राचार्य नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांची दिशाभुल करून आपल्या सोईने कसे होईल याचे नियोजन करतात.
त्यानंतर काम घेऊन आलेल्या नागरीकांना नागविण्याचे काम हे शुक्राचार्य करतात. पारनेर तहसिल कार्यायातील दोघे त्यात निपुण असून कोणाचा हात दगडाखाली आहे हे हेरून त्याच्यावर डाव टाकण्याची त्यांची कला अफलातून आहे. गौण खनिजाच्या ईटीपी पावत्यांच्या झोलमध्येही हेच शुक्राचार्य मास्टरमाईंड आहेत. पारनेरात अती चालत नाही, लवकरच त्याचाही पर्दाफाश होईल.
आ. नीलेश लंके यांच्या प्रयत्नांतून पारनेर यथे अपिलीय कामकाज सुरू झाल्याने वकील संघाने आनंद व्यक्त केला. अपिलीय कामकाजासाठी प्रांताधिकारी गणेश राठोड हे पारनेर येथे आल्यानंतर त्यांचा वकील संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. संघाचे अध्यक्ष अॅड. पंडीतराव कोल्हे.
उपाध्यक्ष अॅड. जमिर शेख, सचिव अॅड. श्रीकांत वाळुुंज, अॅड. एम.आर. गायकवाड, अॅड. सुजित सप्रे, अॅड. संजय गुंड, अॅड. तुषार उबाळे, अॅड. आनंदा पडवळ, अॅड. गणेश कावरे, अॅड. प्रशांत थोरात, अॅड. दिपक मंचरे आदी यावेळी उपस्थित होते.