सुपा येथील शेतकऱ्यांच्या सात बारावरील एमआयडीसीचे शिक्के हटवणार:- उद्योग मंत्री उदय सामंत

1 min read

पारनेर दि.१४:- सुपा येथे उभारण्यात येत असलेल्या औद्योगिक वसाहतीसाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या वाघुंडे बुद्रुक, अपधूप व पळवे खुर्द येथील शेतकऱ्यांच्या सात बारावरील एमआयडीसीचे शिक्के काढण्याची ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. मंत्रालयात आमदार नीलेश लंके यांच्यासह शेतकऱ्यांचे प्रतिनिधी वाघुुंडे बुद्रुकचे उपसरपंच दत्ता दिवटे, किरण रासकर यांनी भेट घेउन शिक्के दुर करण्याची मागणी केली होती. सामंत यांनी पुढील महिन्यात बैठकीचे आयोजन करून हा प्रश्‍न निकाली काढण्याची ग्वाही यावेळी दिली. सुपा-पारनेर औद्योगिक क्षेत्रासाठी शासनाच्या वतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १०६१ च्या तरतुदींनुसार एकूण ९३४.३४ हेक्टर आर क्षेत्र अधिसुचित करण्यात येउन संबंधित शेतकऱ्यांच्या सातबारावर तसे शेरे मारण्यात आले होते. वाघुंडे बुद्रुक २८२.४,पळवे खुर्द २५१.५६, अपधूप १५१.९३, म्हसणे २५.२३, सुलतानपुर ६.७३,बाबुर्डी २१६.४९ या गावांचा त्यात समावेश होता. बाबुर्डी येथील जमीन धारकांचा भुसंपादनास तीव्र विरोध झाल्याने तेथील भुसंपादनाची कार्यवाही अद्यापही प्रलंबित आहे. अधिसुचित क्षेत्रापैकी ६७६.६७ हेक्टर आर क्षेत्रास सन २०१४,२०१५,२०१६ व २०१७ मध्ये टप्प्या टप्प्याने कलम ३२ / १ लागू करण्यात आले आहे. त्यापैकी ५८०.६४ हेक्टर आर क्षेत्राचा ताबा एमआयडीसीला प्राप्त झालेला आहे. सुलतानपुर येथील ०.४०हेक्टर आर क्षेत्र दि. २ /०६ /२०१६ मध्ये विनाअधिसुचित करण्यात आले आहे. भुधारकांचा विरोध असल्याने घरे विहीरी असलेले म्हसणे येथील २४.०३ व सुलतानपुर येथील ६.२६ असे एकूण ३०.२९ हेक्टर आर क्षेत्र वगळण्यास ६० मिटर रस्त्यासाठी आवष्यक क्षेत्र वगळून उच्चाधिकार समितीने दिलेल्या मान्यतेनुसार हे क्षेत्र विना अधिसुचित करण्यासाठी दि. १५ऑक्टोबर २०२० रोजी महामंडळाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे, परंतू अद्याप त्याची अधिसुचना निर्गमित झालेली नाही. दि.९ मे २०२१ रोजी औद्योगिक महामंडळाच्या नाशिक येथील प्रादेशिक अधिकाऱ्यांनी ७३.७६ हेक्टर आर क्षेत्र भुधारकांच्या मागणीप्रमाणे विना अधिसुचित करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर २.६७ हेक्टर आर क्षेत्रातील भुधारकांनीही मागणी केल्याने एकूण ७६.३३ हेक्टर आर क्षेत्राची उपमुख्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दि. १३ जुलै २०२१ रोजी स्थळ पाहणी करण्यात आली. वाघुंडे बुद्रुक येथील ५१.३३ हेक्टर आर, पळवे खुर्द येथील २.७३ हेक्टर आर व अपधूप येथील १८.९३ हेक्टर आर असे एकूण ७२.९९ हेक्टर आर क्षेत्रात बागायती जमीन, घरे असल्याने ते विना अधिसुचित केल्यास नियोजनात अडथळा येणार नाही असा अभिप्राय दिलेला आहे.निर्णय झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या जमिनींवरील अधिसुचित करण्यात आलेले शिक्के हटविण्यात आले नसून इतर हक्कामध्ये हा शेरा असल्याने शेतकऱ्यांना त्याचा त्रास होत आहे. कोणत्याही शासकिय योजनांचा लाभ, वित्तीय संस्थांचे कर्ज, मिळकत हस्तांतर, उद्योग व्यवसायास बाधा येत. असल्याने हे शिक्के हटवावेत अशी आग्रही मागणी आ. लंके यांनी केली. त्यावर पुढील महिन्यात बैठकीचे आयोजन करून हा प्रश्‍न कायमचा निकाली काढू अशी ग्वाही मंत्री सामंत यांनी दिल्याचे उपसरपंच दत्ता दिवटे यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे