पशुखाद्याच्या दरवाढीने दूध उत्पादक आर्थिक संकटात
1 min readआळेफाटा दि.१३:- दुधाच्या उत्पादन खर्चात यंदा मोठी वाढ झाली आहे. पशुखाद्याचे दर सतत वाढत असल्याने पशुपालक शेतकरी अक्षरशः जेरीस आले आहेत. पशुखाद्याच्या दरात १५ ते २० दिवसांत ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पन्नास किलोच्या खाद्याचा दर १४०० ते १७५० रुपयांपर्यंत गेला आहे.
एकीकडे खाद्याचे दर वाढलेले असताना दुसरीकडे दूध दरात मात्र कपात झाली असून १ सप्टेंबर पासून दुधाचा दर २ ते ४ रुपयांनी कमी झाला आहे.पशुखाद्यामध्ये सरकी, पेंड, आटा, हरभरा असे प्रकार आहेत. सरकी व पेंडीला शेतकरी पसंती देतात. सध्या विविध कंपन्यांचे पशुखाद्य बाजारात उपलब्ध आहे. ५० किलोंच्या पोत्यासाठी खाद्याचे दर हे १४०० ते १७५० रुपये दर आहे. पशुखाद्याचे दर वाढले असल्याने जनावरांना खाद्य शेतकऱ्यांना परवडत नाही, तरी चांगल्या प्रतीचे दूध मिळावे, म्हणून अधिक झळ सोसून शेतकरी जनावरांना खाद्य घालत आहेत. सरकारने पशुखाद्याचे दर कमी करावेत, अथवा त्यावर अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून हाेत आहे.
– भुशा ४५ किलोसाठी १३५०,
-सरकी पेंड ५० कीलोसाठी १६५०,
– मका पाउडर ४५ कीलोसाठी १३००
– क्याटल फिल्ड ५० किलोसाठी १५०० ते १७००]
“सर्व कंपन्यांच्या पशु खाद्याच्या दरामध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सुमारे पन्नास रुपयांची दरवाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पशुखाद्य विकत घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे.”
संदीप गुंजाळ
पशुखाद्य विक्रेते, आणे
” पशु खाद्याचे दर वाढल्याने महिन्याचा ७०० ते ८०० रुपये खर्च वाढला आहे. दुधाचे दर कमी होतात पशु खाद्याचे दर सतत वाढत जातात. दुग्ध व्यवसायीक शेतकरी जेरीस आले असून पशुंचा खाद्य, डॉक्टर यांचा मोठा खर्च आहे. शेतकऱ्याला मिळणारा दूध दर व प्रत्यक्ष ग्राहकाला मिळणार दूध दर यात खूप तफावत आहे.”
संभाजी बांगर,
दुग्ध उत्पादक शेतकरी, बेल्हे