पहिल्या टप्प्यातील कांदा लागवड दोन महिने उशिरा
1 min read
आळेफाटा दि.६:- जुन्नर तालुक्याच्या पुर्व भागातील गावांमध्ये पहील्या टप्प्यातील कांदा लागवडी सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यंदा पावसाने दांडी मारल्यामुळे खरिपाची ही कांदा लागवड तब्बल दीड ते दोन महिन्यांनी उशिरा लागवड सुरू झाली आहे. जुन्नर तालुक्याच्या पुर्व भागातील राजुरी, वडगाव कांदळी, उंचखडक, गुंजाळवाडी, जाधववाडी, भोरवाडी, आणे पठार, बेल्हे बांगरवाडी, गुंजाळवाडी गुळुंचवाडी या गावांमध्ये पहील्या टप्प्यातील म्हणजे पावसाळ्यात पिकवणारा फुरसुंगी या जातीच्या कांदा लागवडीला सुरवात झालेली आहे. गेल्या वर्षी तालुक्याच्या या भागातील बहुतेक शेतक-यांणी कांद्याचे मोठे उत्पादन घेतले होते.
या भागातील शेतक-यांनी ठेवलेल्या उन्हाळी कांद्याला चांगला बाजार भाव मिळेल या आशेने कांदा साठवून ठेवला होता. परंतु चांगला बाजार भाव मिळाला नाही. एवढ्या दिवस कांदा चाळीत ठेवल्याने ५० टक्के कांदा सडला. त्यामुळे शेतकरी पुर्णपने मेटाकुटीला आला आहे. त्यातच शेतक-यांनी सुरवातीला जी कांद्याची रोपे टाकली होती ती पावसाअभावी जळून गेली होती.
जून, जुलै, ऑगस्ट कोरडा ठाण गेला तर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गणपतीच्या सीजन मध्ये पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी कांदा लागवड सुरू केली आहे. पावसाचा फटका या वर्षी होणा-या कांदा लागवडींवर झाला आहे. त्यामुळे या वर्षी कांद्याच्या उत्पादनात घट होणार असल्याचं शेतकरी सांगत आहेत.
“यावर्षी पावसा अभावी खरीप सीजन मधील लागवड या आठवड्यात सुरू केली आहे. आत्तापर्यंत शेतामध्ये पावसाअभावी कुठलेही पीक घेता आलं नाही.गणपती मद्ये पाऊस झाल्याने खरीप कांदा लागवडीची सुरुवात केली आहे. दर वर्षी ऑगस्ट महिन्यात आम्ही कांदा लागवड करत असतो.यंदा पावसा अभावी लागवडीला दीड महिने उशीर झाला आहे”
गाजानन फराटे
कांदा उत्पादक शेतकरी, बांगरवाडी