दिवाळीच्या आत पीक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम जमा करणार:- कृषी मंत्री धनजंय मुंडे
1 min readमुंबई दि.३:- राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचा २५ टक्के अग्रीम दिवाळीच्या आत जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी येथे दिली.
नागपूर येथे ढगफुटी पावसानंतर शेतीच्या नुकसानीचा नुकताच मंत्री मुंडे यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बाेलत हाेते. मंत्री मुंडे म्हणाले, ”राज्यात एक काेटी ७० लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे.
नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईसाठी देय रकमेची २५ टक्के रक्कम दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा हाेणार आहे.” ‘एक रुपयात पीकविमा’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या हिश्याचे ४०६ कोटी रुपये राज्य सरकारने विमा कंपन्यांना वितरीत केले आहेत.
त्यामुळे पावसाअभावी खरीप वाया गेलेल्या जवळपास सव्वाकोटी शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेतील २५ टक्के रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. साधारणत: २० ऑक्टोबरपासून भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल.