शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्यावर प्राणघातक हल्ला; मंचर जिल्हा उप रुग्णालयात उपचार सुरू
1 min readमंचर दि.२:- शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्यावर अज्ञात दहा ते बारा तरुणांनी हल्ला करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना आज सोमवार दि.२ सकाळी १० वाजल्याच्या सुमारास घडली आहे. बांगर यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांच्यावर झालेल्या या जीवघेण्या हल्याचे पडसाद जिल्हाभर दिसून येत असून सर्वत्र निषेध होत आहे.
जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या बैठकीसाठी जात असताना, कळंब च्या हद्दीत १० ते १२ अज्ञात तरुणांनी पाठलाग करून प्रभाकर बांगर यांच्यावर हल्ला केला. या तरुणांनी प्रभाकर बांगर यांना जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते आहे.
प्रभाकर बांगर यांच्यावर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रभाकर बांगर यांच्यासोबत त्यांचे सहकारी वनाजी बांगर हे देखील होते.
वणाजी बांगर यांनी संबंधित हल्लेखोर हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून त्यांनी प्रभाकर बांगर यांना आमच्या साहेबांविषयी बोलतो का असे म्हणत तब्बल अर्धा तास मारहाण केल्याची माहिती दिली.