जुन्नर तालुक्यात दमदार पाऊस; वडज व डिंबे धरण १०० टक्के भरले
1 min readबेल्हे दि.२७:- जुन्नर तालुक्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाच वातावरण आहे. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात यंदा मोसमातला चांगला पाऊस या ७ दिवसांत झाला आहे.
कुकडी पाटबंधारे विभागामध्ये आज बुधवार दिनांक २७ रोजी वडज धरण १००, डिंबे १०० टक्के भरले आहे. तर येडगाव धरण ६३ %, माणिकडोह ७७.७३ टक्के, पिंपळगाव जोगे ९१.९५ टक्के, विसापूर २६.७८ टक्के, चिल्हेवाडी ८९.२९ टक्के तर घोड धरण ५१.७१ टक्के भरले आहे.
आज नारायणगाव, निमगाव सावा या गावांत दमदार पाऊस झाला.तालुक्यातील काही भागात ओढे, नाले खळखळून वाहू लागले आहेत. पावसाळा सुरू झाल्या पासून यंदाचा पहिलाच दमदार पाऊस झाला आहे.तसेच आज बेल्हे, गुंजाळवाडी, गुळुंचवाडी, राजुरी, साकोरी, तांबेवाडी, बोरी, आळे, पारगाव, मंगरुळ, बांगरवाडी या गावांत पावसाने जोरदार हजेरी लावली.
आणे पठारावरील नळवणे शिंदेवाडी,आनंदवाडी, नळवणे, व्हरुंडी या भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जनावरांचा चाऱ्याचा व पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या भागाला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
या आठ दिवसात झालेल्या पावसामुळे आणे पठारावरील पाणीसाठा अद्यापही उपलब्ध झालेला नाही. येथील बंधारे तलाव भरले नसले तरी यावर्षीतला हा सर्वात मोठा पाऊस असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.या भागात जोरदार पावसाची अपेक्षा असून पाणीसाठा उपलब्ध होणे गरजेचे आहे.
पारगाव तर्फे आळे ते नेहरमाळा रस्ता ओढ्याला पूर आल्याने रस्ता बंद झालेला आहे. तरी नेहरमळ्यात जाणाऱ्या येणाऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.