घरफोड्या करणाऱ्या दरोडेखोरांची टोळी विटा पोलिसांनी केली जेरबंद; २ लाख रुपयांचे दागिने हस्तगत
1 min read
विटा दि. २८:- आठ दिवसांपूर्वी रेणावी (सांगली ता. खानापूर) येथील घाटात सहा दरोडेखोरांची येळी पोलिसांनी पकडली. त्यांनी विटा व रेवणगाव येथे घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या ताब्यातील दोन लाख सात हजार आठशे रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने हस्तगत केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, त्यांना पोलिसांनी विटा न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्यांना न्यायालयीन कोठडीचा आदेश मिळाला.१७ ऑगस्ट रात्री साडे अकराच्या सुमारास जितेंद्र भानुदास काळे (वय ३०), सुखदेव शिवाजी काळे (३२), किरण शिवाजी काळे (२९), बालाजी माणिक पवार (२६, सर्व माडी, ता. उत्तर सोलापूर), दादाराव लक्ष्मण पवार (४२, रानमसले, ता. उत्तर सोलापूर), शिवाजी रामा काळे (वय २६ मूळ, जत, जि. सांगली, सध्या मार्डी) या सहा जणांच्या
टोळीला सापळा रचून पकडण्यात आले होते. त्यांना अटक करून विटा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने नऊ दिवस पोलिस कोठडीचा आदेश दिला. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता विटा येथील पोपटराव विठोबा जाधव, शंकर देवाप्पा आदाटे व नितीन महादेव पवार तसेच रेवणगाव (ता. खानापूर) येथील सुमन माणिकराव मुळीक यांची घरे फोडून सोन्याचांदीचे दागिने चोरल्याची कबुली त्यांनी दिली.
त्यांच्याकडून साठ हजार रुपये किमतीच्या वीस प्रेमच्या सोन्याच्या दहा अंगठया, साठ हजारांच्या वीस ग्रॅमच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, सहा हजारांच्या दोन ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा, नऊ हजारांचे तीन ग्रॅमचे कानातील सोन्याचे टॉप्स, सहा हजारांचे दोन ग्रॅमचे बदाम, बावीस हजारांचे सात ग्रॅमचे मणीमंगळसूत्र, चौदा हजार आठशे रुपयांचे चांदीचे दोन गणपती, आरती, कुंकवाचा करंडा, तीस हजाराची पाच ग्रॅमची सोन्याची तीन कर्णफुले हस्तगत केल्याचे डोके यांनी सांगितले.