महावितरण कार्यालयातून बोलतोय तुमचे वीज बील अपडेट झालेले नाही सांगून, ॲप डाऊनलोड करताच माजी सरपंचाचे बँक खाते रिकामे; ५ लाख ३४ हजारांची फसवणूक

1 min read

जामखेड दि.२:- ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून नगर जिल्ह्यातील जामखेड मधील एका माजी सरपंचाची फसवणूक झाली आहे. महावितरण कार्यालयातून बोलत आहे. तुमचे वीज बील अपडेट झालेले नाही, ते करण्यासाठी मोबाईलमध्ये ‘क्विक सपोर्ट’ नावाचे ॲप डाऊनलोड’ करा,’ असे सांगणारा एक फोन येतो. माजी सरपंच ते ॲप डाऊनलोड करतात आणि क्षणात त्यांचे बँक खाते रिकामे होते. ही घटना आहे जामखेड तालुक्यातील बोर्ले येथे घडली आहे. याप्रकरणी नगर येथील सायबर पोलिस ठाण्यात बोर्ले गावचे माजी सरपंच भारत नारायण काकडे (वय ५९) यांनी फिर्याद दिली आहे. आपली ५ लाख ३४ हजारांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.भारत काकडे यांनी सायबर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, अज्ञात व्यक्तीने त्याच्या ९८८३९७४६७९ या मोबाईलवरुन फोन करत आपण ‘महावितरण’ मधून बोलत आहोत. तुमचे लाईट बील सिस्टींममध्ये अपडेट झालेले नाही. ते अपडेट करुन घेण्यासाठी क्विक सपोर्ट नावाचे ऑप मोबाईलमध्ये डाऊनलोड करा. फिर्यादीने ते ॲप डाऊनलोड केल्यानंतर सदरील व्यक्तीने काकडे यांच्या मोबाईलचा अॅक्सेस घेत. त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून ५ लाख ३४ हजार रुपये एवढी रक्कम ऑनलाईन काढून घेतली. ही बाब काकडे यांच्या लवकर लक्षात आली नाही. जेव्हा त्यांना आपली फसवणूक झाली आहे, असे समजले तेव्हा त्यांनी जामखेड पोलिसांशी संपर्क साधत माहिती दिली.मात्र फसवणूक झालेली रक्कम ५ लाखांपेक्षा जास्त असल्याने जामखेड पोलिसांनी त्यांना नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी (दि.२९) दुपारी नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय सोनवणे हे करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे