पारनेर तालुक्यातील अंगणवाडयांसाठी २२ लाख ५० हजारांचा निधी:- आमदार नीलेश लंके

1 min read

पारनेर दि.२०:- जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून तालुक्यातील मांडवे खुर्द व वनकुटे, तास येथील अंगणवाडयांसाठी २२ लाख ५० हजार रूपयांचा निधी मंजुर करण्यात आल्याची माहिती आ. नीलेश लंके यांनीं दिली. मांडवे खुर्द येथील गावठाणांतर्गत अंगणवाडी खोली बांधण्यासाठी ११ लाख २५ हजार तर वनकुटयातील तास येथे अंगणवाडी खोली बांधकामासाठी ११ लाख २५ हजारांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. दोन्ही गावांमध्ये अंगवाडीसाठी इमारत नसल्याने अंगणवाडीमध्ये येणाऱ्या बालकांची हेळसांड होत असे. ग्रामस्थांनी त्याबाबत आ. नीलेश लंके यांना माहीती दिल्यानंतर लंके यांनी पाठपुरावा करून जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत दोन्ही अंगणवाडयांसाठी प्रत्येकी ११ लाख २५ हजार रूपयांचा निधी मंजुर करून घेतला.
आ. लंके म्हणाले, विकास कामे ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून विकास कामांना मोठया प्रमाणावर निधी मंजुर करतानाच शिक्षणाकडेही आपले जाणीवपुर्वक लक्ष आहे. बालकांच्या शिक्षणास अंगणवाडयांपासून सुरूवात होते. त्यामुळे अंगणवाडयांमध्ये चांगल्या सुविधा देणे आपले कर्तव्य आहे. मांडवे खुर्द तसेच तास येथील ग्रामस्थांची मागणी आल्यानंतर आपण दोन्ही ठिकाणी अंगणवाडी खोली बांधकामासाठी आपण प्राधान्याने निधी मंजुर करून घेण्याची काळजी घेतली. जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांसाठी निधीची मागणी असून हा निधी मंजुर करून देण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे. लवकरच शाळा खोल्यांसाठीही निधी मंजुर होईल असा विश्‍वास आ. लंके यांनी व्यक्त केला. आ.लंके पुढे म्हणाले, पारनेर-नगर मतदार संघ हा बुध्दीमत्तेची खाण आहे. येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाची आस आहे. त्यामुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आपण आपल्या परीने प्रयत्नशील असतो असे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे