रोटरी क्लब नारायणगावचे पोलीस बांधवांसाठी रक्षाबंधन

1 min read

नारायणगाव दि.३१:- रोटरी क्लब नारायणगावने (ता.जुन्नर) आपली परंपरा जपत या वर्षी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या पोलीस बांधवांना राख्या बांधून रक्षाबंधनचा सण साजरा केला. यावेळी पोलीस बांधव आणि त्यांचे कुटुंबीय यांना कर्तव्य कार्याच्या व्यस्ततेतून आणि ताणातून विरंगुळा मिळावा. मनमोकळ हसावं यासाठी सुप्रसिद्ध एकपात्री हास्यकलाकार मकरंद टिल्लू यांचे ‘जगण्यासाठी हसा आणि हसण्यासाठी जगा’ हे खळखळून हसवणारे आणि हसतहसत ताणतणाव घालवणारे व्याख्यान रोटरी क्लब नारायणगाव तर्फे आयोजित करण्यात आले होते. अशी माहिती रोटरी क्लब नारायणगावचे प्रेसिडेंट संदीप गांधी यांनी दिली.या वेळी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार आणि पोलीस बांधव आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. हसणं ही मनाला ताजतवान आणि निरोगी राखण्यासाठी करण्याची योगसाधना आहे. हसण्यातून सर्व चेतना, संवेदना प्रफुल्लित होतात. त्यामुळे भरपूर हसायला हवं असं मकरंद टिल्लू म्हणाले. यावेळी मनोगत व्यक्त करताना स. पो. नि. महादेव शेलार यांनी पोलीस खात्यात काम करताना हसण्याचे क्षण क्वचितच येतात आणि कामाच्या व्यापात कुटुंबीयांना वेळ देणंही दुरापास्त होतं अस सांगितलं. तसेच आपल्या अनुभवांच आणि कार्यपध्दतीचं कथन करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. रोटरी क्लब नारायणगाव करीत असलेल्या उपक्रमांची त्यांनी प्रशंसा केली.रक्षाबंधन साजरे करत असताना रोटरी आउन्सने पोलीस बांधवांना राख्या बांधल्या.यंदा रक्षाबंधनसाठी राख्या नारायणगाव येथील जि. प. शाळेतील मुलींसाठी रोटरी क्लब नारायणगावने आयोजित केलेल्या राख्या तयार करण्याच्या कार्यशाळेत बनविण्यात आल्या होत्या. यावेळी रोटरी क्लब नारायणगावचे सदस्य आणि आऊन्स बहु संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे आयोजन उपक्रम समन्वयक रो. के. एस. बांगा यांनी केले. तसेच हा उपक्रम यशस्वीपणे संपन्न करण्यात प्रेसिडेंट संदीप गांधी, सेक्रेटरी स्वप्नील जुन्नरकर, फर्स्ट लेडी वर्षा गांधी, सर्व रोटरिअन्स आणि आपन्स यांनी सहभाग घेतला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे