कोथिंबीर जुडी एक रुपया; कवडीमोल भावामुळे एक एकर कोथिंबीरीवर फिरवला रोटर
1 min readबेल्हे दि.२८:- कवडीमोल भावामुळे बेल्हे (ता.जुन्नर) येथील दत्तनगर मळ्यात राहणारे गंगाधर शंकर गायकवाड यांना आपल्या एक एकर क्षेत्रावरील कोथिंबीर पिकावर रोटर फिरवण्याची वेळ आली. जीवापाड जपलेल्या पिकावर रोटर फिरवण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांवर मोठ आर्थिक संकट उभा राहिले आहे. भर पावसाळ्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी अगोदरच चिंताग्रस्त झाला असून कोथिंबीर पिकाला शेकडा १०० रुपयांचा मातीमोल बाजारभाव मिळत असून त्यापेक्षा बियाणे, लागवड, काढणे, वाहतूक इत्यादीचा खर्च जास्त असल्याने नाईलाजाने गायकवाड यांनी आपल्या आपल्या कोथिंबीर पिकावर रोटर फिरवून भुई सपाट करून टाकले.राज्यात कोणाचेही सरकार असू देत सिंगल इंजिन, डबल इंजिन आणि आता तर ट्रिपल इंजिनचे सरकार असूनही शेतकऱ्यांच्या जीवनमानात कोणताही फरक होताना दिसत नाही, कधी अतिवृष्टी, तर कधी ओला दुष्काळ, तर कधी कोरडा दुष्काळ यांच्याशी सामना करताना शेतकरी अगदी मेटाकुटीला येत असल्याचे दिसत आहे. त्यातूनही काही पिकविले तर त्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळणे कठीण झाले आहे त्यामुळे आलेले पीक व्यापाऱ्यांना फुकट देण्यापेक्षा ज्या मातीतून पिकविले त्या मातीतच गाडून टाकलेले बरे असा विचार शेतकरी करतो किंवा उभ्या पिकात जनावरे तरी सोडून दिली जातात. अनुकूल-प्रतिकूल अशा सर्व परिस्थितीशी दोन हात करत येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.