कांदा चाळीत साठवलेली पाचशे कांदा पिशवी खराब
1 min read
बेल्हे दि.२१:- कांदा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत असतानाच कांदा चाळीत साठवून ठेवलेला कांदा सध्या खराब होत आहे. कांद्याचे दर घसरले असल्याने हवालदिल झालेला शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा धक्का दिला असून ४० % निर्यात शुल्क लागू केल्याने शेतकऱ्यांवरती अन्याय झाला असल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. त्या निषेधार्थ जागोजागी आंदोलन करण्यात येत आहेत.कांदा उत्पादक शेतकरी वैशाली डोळस (रा.रानमळा, ता. जुन्नर) यांची मार्च,एप्रिल,मे मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा चाळीत जास्त काळ टिकून राहिला नाही. दर वर्षी कांदा चाळीत खराब होत नाही परंतु यंदा अवकाळी पावसाने कांद्याची गुणवत्ता कमी झाली.
मे महिन्यात सुमारे १००० कांदा पिशवी चाळीत साठून ठेवली होती.त्या पैकी ५०० पेक्षा जास्त कांदा पिशवी खराब झाली. सदर कांदा विक्रीसाठी बाहेर काढला असता कांद्याचे अतोनात नुकसान झाल्याचे पाहून डोळस हताश झाल्या आहेत.
तर दुसरीकडे कांद्याला अपेक्षित असा भाव सुद्धा नसल्यामुळे यंदा खरीप हंगामातील सर्व पिके पावसा अभावी जळू लागले आहेत. जुन्नर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.