जुन्नर येथे बिबट सफारीसाठी ८० कोटी रुपयांची तरतूद;- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

पुणे, दि.२८ – जुन्नर येथे बिबट सफारी स्थापण्यात येणार आहे, यासाठी ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीची भरपाई ३० दिवसांत पीडितास न मिळाल्यास त्या रकमेवर व्याज देण्यात येईल आणि ते व्याज संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल केले जाईल. या विषयातील विधेयक विधिमंडळातील दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले आहे. विधान परिषदेत हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकावर बोलताना वनमंत्री मुनगंटीवार यांनी जुन्नर येथे बिबट सफारी स्थापणार असल्याचे जाहीर केले.वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य व पाळीव प्राण्यांची प्राणहानी होते. तसेच गंभीर इजा ही होते. त्याचप्रमाणे शेती, फळबागा तसेच घरांचे नुकसानही होते. या सर्व प्रकारच्या नुकसानाच्या व्याख्या करून त्यांची भरपाईची रक्कम भरघोस वाढविण्याकरता प्रस्ताव विचाराधीन आहे. मात्र, जी काही नुकसान भरपाई पिडितास मिळते ती देखील ३० दिवसांत मिळाली पाहिजे, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यास जबाबदार धरून भरपाईच्या रकमेवरचे व्याज त्याच्याकडून वसूल करून पीडितास देण्याची तरतूद मंजूर झालेल्या विधेयकात करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे