राज्यातील सर्वांना मिळणार ५ लाखां पर्यंतचा मोफत उपचार; महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील सुधारणेचा शासन निर्णय जारी
1 min read
मुंबई दि.३० : महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्रधारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होणार असून. या योजनेंतर्गत आरोग्य संरक्षण प्रतिकुटुंब प्रतिवर्ष दीड लाख रुपयांवरून ५ लाख रुपये एवढे करण्याचा निर्णय २८ जून, २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार एकत्रित योजना अंमलबजावणीचा शासन निर्णय शुक्रवार, २८ जुलै, २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
राज्यात यापूर्वी केशरी शिधापत्रिका व अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र, यापुढे राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक,अधिवास प्रमाणपत्र प्राप्त नागरिकांना आरोग्य संरक्षणाचे कवच प्राप्त झाले आहे. अशाप्रकारे केंद्र व राज्याची एकत्रित योजना राबवणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश झाला आहे.
आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प्रतिकुटुंब प्रतिवर्ष ५ लाख रुपये आहे. आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गतही आरोग्य संरक्षण प्रतिकुटुंब प्रतिवर्ष ५ लाख रुपये एवढे करण्यात आले आहे.महात्मा फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत रुग्णालयांची संख्या १००० एवढी आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजना ही या आधीच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात लागू करून सीमेलगतच्या महाराष्ट्र राज्यातील ८ जिल्ह्यांत १४० व कर्नाट राज्यातील १० अतिरिक्त रुग्णालये अंगीकृत करण्याचा निर्णय झाला आहे. या व्यतिरिक्त २०० रुग्णालये अंगीकृत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
आता अंगीकृत रुग्णालयांची संख्या १३५० होईल. यामध्ये सर्व शासकीय रुग्णालय अंगीकृत करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त यापुढे मागास भागात नव्याने सुरू होणारी सर्व रुग्णालये,अशा रुग्णालयांची इच्छा असल्यास या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत करण्यात येतील.
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेच्या १४ ऑक्टोबर २०२० च्या शास निर्णयातील तरतुदीमध्ये सुधारणा करून रस्ते अपघातासाठीची उपचारांची संख्या ७४ वरून १८४ अशी वाढवण्यात आली आहे. उपचाराच्या खर्च मर्यादेत ३० हजार रुपयांवरून प्रतिरुग्ण प्रतिअपघात १ लाख रुपये अशी वाढ करण्यात आली आहे.
या योजनेचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात आला आहे. यामध्ये राज्याच्या भौगोलिक क्षेत्रातील रस्ते अपघातात जखमी झालेल्या, राज्यातील व देशातील रुग्णांचा समावेश करण्यात आला आहे.