नारोडी : महिला पत्रकाराला धमकावल्याप्रकरणी पत्रकार महासंघ आक्रमक

1 min read

मंचर, ता. २७ : समर्थ भारत माध्यम समूहाच्या संपादिका स्नेहा बारवे यांना आमच्या गावच्या खड्ड्यांवर आणि तमाशावर बातमी का बनवली, असे म्हणत रस्त्यात अडवून घातपात करण्याची आणि कार्यालयात घुसून तोडफोड करण्याची धमकी दिल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ आक्रमक झाला असून. पत्रकार महासंघाच्या वतीने मंचर आणि पारगाव पोलिसांना निवेदन देत निषेध करण्यात आला आहे.नारोडी (ता. आंबेगाव) गावातून नारोडी फाट्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून झालेल्या दुर्दशेवर समर्थ भारत माध्यम समूहातील SBP या वृत्तवाहिनीवर दि. २४ जुलै २०२३ रोजी एक वृत्त प्रसारित करण्यात आले होते. या वृत्तामध्ये गावातील पुढाऱ्यांना तमाशा भरविण्यासाठी आर्थिक तरतूद करता येते, मात्र रस्त्यांच्या दुर्दशेवर आणि इतर समस्यांवर लक्ष देण्यासाठी आर्थिक चणचण भासते, अशा आशयाचे भाष्य करण्यात आले होते.हे वृत्त प्रसारित झाल्यानंतर गावातील काही पुढाऱ्यांनी समर्थ भारत माध्यम समूहाच्या संपादिका स्नेहा बारवे यांना प्रत्यक्ष भेटून आणि फोन करून धमकाविले. आम्ही आमच्या गावात काहीही करू, तुम्ही आम्हाला विचारणारे कोण? आम्ही तमाशा भरवू किंवा पैसे उधळू, तुम्हाला काय करायचं आहे? आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आम्ही आमच्या गावातील महिलांना तुमची गाडी अडवून पाहून घेतील. तुम्हाला रस्त्याने जाऊ देणार नाही. तुमच्या कार्यालयात काही ठेवणार नाही. अशा पद्धतीने धमकी दिली.समर्थ भारत माध्यम समूहाच्या संपादिका स्नेहा बारवे यांना नारोडी गावातील गावगुंडांनी आणि तमाशा शौकिनांनी दिलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मंचर आणि पारगाव पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे अनेक पदाधिकारी जमले होते. दरम्यान मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे राजाध्यक्ष डॉ. समीर राजे, पुणे जिल्हा सहसचिव अंकुशराव भूमकर, माजी अध्यक्ष डॉ. अतुल साबळे, माजी सचिव आणि स्वराज्य संवादचे संपादक ज्ञानेश्वर खिरड आंबेगाव, तालुका उपाध्यक्ष विलासराव भोर, कार्याध्यक्ष उत्तमराव टाव्हरे, संघटक विजय कानसकर, टायगर टाइम्सचे संपादक विश्वजित गवार. प्रसिध्दी प्रमुख धनंजय पोखरकर, सह संपर्क प्रमुख नवीन सोनवणे, समन्वयक संतोष गावडे, नियोजन समितीचे उपाध्यक्ष नंदकुमार पोखरकर, सचिव दत्ता नेटके, आश्विन लोढा, माजी उपाध्यक्ष विजय साळवे, अमोल जाधव, स्वप्नील जाधव, निवृत्ती मंडलिक आदि पत्रकार बांधव उपस्थित होते.पश्चिम महाराष्ट्रसह राज्यभरात नावाजलेल्या समर्थ भारत माध्यम समूहाच्या संपादिका असणाऱ्या स्नेहा बारवे यांना जर गावगुंड अशा पद्धतीची धमकी देण्याची हिंमत करत असतील तर सर्वसामान्य पत्रकारांची काय अवस्था असेल, असे म्हणत महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ आक्रमक झाला आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या वतीने मंचर पोलीस स्टेशन येथे निषेध नोंदवत निवेदन देण्यात आले असून; पत्रकार महासंघाच्या वतीने पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याचे पुणे जिल्हाध्यक्ष सचिन धुमाळ यांनी सांगितले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे