पांडुरंग पवार यांच्या माध्यमातून आण्यात शासकीय योजना मार्गदर्शन मेळावा संपन्न

आणे दि.२० : आणे (ता.जुन्नर) येथे माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वरदान असलेल्या विविध प्रकारच्या शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मेळावा घेण्यात आला.श्री रंगदास स्वामी महाराज सांस्कृतिक भवनात संपन्न झालेल्या या मेळाव्यात पुणे जिल्हा कृषी संशोधन विभागाचे प्रमुख पी. टी. काळे यांनी शेतकऱ्यांना कृषी संबंधित जोडधंदे व त्यासाठी शासनाच्या असलेल्या विविध योजना याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
विशेषतः दुग्धव्यवसाय व त्यातून असलेल्या उद्योगाच्या संधी, त्यासाठी मिळणारे शासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन तसेच शासनाकडून मिळणारे अर्थसहाय्य या विषयी सविस्तर माहिती दिली.
या वेळी पांडुरंग पवार, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी, एच. डी. एफ.सी. बँकेचे पुणे जिल्हा प्रमुख श्रीनिवास साखरे, त्यांचे सहकारी रोहित खुलपे, अजिंक्य काळे, तुषार शेटे, देवस्थान संस्थेचे अध्यक्ष मधुकर दाते तसेच आणे पठारावरील शेतकरी बांधव उपस्थित होते.
या मेळाव्याचे आयोजन आणे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते व शिंदेवाडीचे माजी सरपंच रोहिदास शिंदे यांनी केले होते.