नारायणगावला मिळाले दबंग सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार; स्वीकारला पदभार
1 min read
नारायणगाव दि. १६ : नारायणगाव पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर दबंग पोलिस अधिकारी म्हणून ओळख असलेले महादेव शेलार हजर झाले आहेत. या आधीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांची बारामती शहर पोलीस स्टेशनला बदली झाली आहे.नारायणगाव पोलीस स्टेशनला नव्याने हजर झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी सन २०१२-१३ नाशिक येथे ट्रेनिंग पूर्ण केले. २०१३-१४ पडघा (ठाणे ग्रामीण), २०१४-१६ जव्हार (ठाणे), २०१६ – १८ माणिकपूर (वसई) पोलीस स्टेशन तर २०१८-२०२२ कालावधीत गडचिरोली येथे विनंती बदलीची मागणी करुन पोलीस उपनिरीक्षक पदावर काम केले आहे.
त्यानंतर सात महिने गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे काम केले असून प्रथमच नारायणगाव पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली असल्याचे शेलार यांनी सांगितले.शेलार यांनी म्हटले, गडचिरोली येथे काम करताना नागरी कृती दलाची स्थापना करून त्याचे इन्चार्ज म्हणून लोकहिताची कामे केली आहेत. आदिवासी भागातील गोरगरीब नागरिकांना शासनाच्या विविध योजना समजावून देणे, महसूल विभागाचे कागदपत्र पूर्ण करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
नारायणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत काम करताना नागरिकांच्या सुरक्षेसाठी रात्रीची पोलिस गस्त वाढवणार असून नारायणगावातील रहिवासी सोसायटीचे अध्यक्ष, दुकानदार, पेट्रोल पंप चालक, व्यापारी यांना एकत्रित करून सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि कराव्या लागणाऱ्या उपाययोजना यावर चर्चा करण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांनी अनोळखी अथवा संशयित व्यक्ती अथवा माहिती असल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी केले आहे.