दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
1 min read
निमगाव सावा दि.१३:- निमगाव सावा (ता. जुन्नर) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दि.१२ जानेवारी २०२६ रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, चारित्र्यनिर्मिती, संस्कार, नेतृत्वगुण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा होता.कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस प्रा. नीलम गायकवाड व प्रा.ज्योती गायकवाड हस्ते पुष्पहार अर्पण व प्रतिमा पूजन करण्यात आले.
त्यानंतर दीपप्रज्वलन व प्रार्थना करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुभाष घोडे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा.नीलम गायकवाड यांनी भाषणात राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारक्षम मातृत्वामुळे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान राष्ट्रपुरुष घडला, हे उदाहरण देऊन आईच्या संस्कारांचे महत्त्व विशद केले.
तसेच स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी तरुणांना आत्मविश्वास, धैर्य आणि राष्ट्रसेवेसाठी प्रेरित केले असल्याचे सांगितले. स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील ऐतिहासिक भाषणाचा उल्लेख करून भारताची आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा जगासमोर मांडण्याचे कार्य त्यांनी केले, असे नमूद केले. तसेच आजच्या तरुण पिढीने त्यांच्या विचारांचा अंगीकार करावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमादरम्यान साक्षी गाडगे या विद्यार्थिनीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रभावी भाषणे सादर केले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राचार्य, सर्व विभागप्रमुख, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. उत्तरा काटे यांनी आभार प्रदर्शन केले. व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
