मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
1 min read
मुंबई दि.१३:- मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी मुंबईतील शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची काल जाहीर सभा झाली, या सभेत राज ठाकरेंनी व्हिडिओ प्रदर्शन करत मुंबई कशाप्रकारे एखाद्याच्या घशात घातली जात आहे, एकाच उद्योगपतीला का श्रीमंत केलं जात आहे,
असे म्हणत उद्योगपती गौतम अदानींचं गेल्या 10 वर्षातील वाढलेलं साम्राज्य दाखवलं होतं. तसेच, मुंबई विमानतळाचे स्थलांतर करुन नवी मुंबईला हे विमानतळ हलवलं जात आहे. येथील मुंबई विमानतळाची जागा हडपण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला होता.
त्यामुळे, आजच्या महायुतीच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. येथील सभेतून देवेंद्र फडणवीसांनीही ठाकरे बंधूंवर विशेषत: राज ठाकरेंवर निशाणा साधला.शिवाजी पार्कमधील सभेत देवेंद्र फडणवीसांनीसुद्धा
‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत ठाकरे बंधूंची एकमेकांवर टीका करत असलेली चित्रफीत दाखवत ठाकरे बंधूंवर पलटवार केला. तत्पूर्वी एकनाथ शिंदेंनी भाषण करत ठाकरे बंधूंवर टीका केली, काहींना निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो. इतरवेळी नेटफ्लिक्स आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स, असे म्हणत राज ठाकरेंना टोला लगावला.
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात लाव रे तो व्हिडिओ म्हणताच शिवाजी पार्कवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा एक व्हिडिओ चालवण्यात आला. त्यामध्ये, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांवर टीका केली होती, तर संजय राऊतांकडूनही टीका होत असल्याचं पाहायला मिळालं.
तसेच, दुसऱ्याची लेकरं स्वत:च्या मांडीवर खेळवता म्हणता, तुम्ही माझ्या आई-वडिलांवर बोललात. पण मी तुमच्या कुटुंबावरर टिका करणार नाही, माझ्यावरती ते संस्कार नाहीत. माझं ठीक आहे, पण तुमचे वडील बघत असतील तर काय बोलत असतील जेव्हा तुम्ही रशीदमामूला सोबत घेऊन आहात,
असा पलटवार उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांनी केला. मुंबईचं विमानतळ यांना विकायचं आहे, म्हणून नवी मुंबईतील विमानतळ सुरू होत आहे. तुम्ही मातोश्री 1 वरुन मातोश्री 2 वर गेले, राज ठाकरे कृष्णकुंज वरुन शिवतीर्थवर गेले. कारण, तुम्हाला जागा पुरत नाही.
मग, गेल्या 25 वर्षांपासून नवी मुंबईत विमानतळ करायची मागणी होती, पण तुम्ही काहीच केलं नाही. आमचे सरकार आल्यावर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर नवी मुंबई विमानतळाच्या कामाला गती दिली. आता, आम्ही तिसरं विमानतळही मुंबईत करतोय, याची घोषणा करतो.जर लंडनला तीन एअरपोर्ट असू शकतात,
तर माझ्या मुंबईत तीन विमानतळ का असू नयेत, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंच्या आरोपावर पलटवार केला. तसेच, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट हे दीडपट मोठं करणार, त्याची क्षमता वाढवणार आहे, अशी घोषणा मी करत असल्याचेही फडणवीसांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात उद्योगपती गौतम अदानींच्या वाढलेल्या संपत्तीवरुन केलेल्या टीकेलाही प्रत्त्युत्तर दिलं. भारताची अर्थव्यवस्था 2014 मध्ये जगात 11 वी होती, आता 5 वी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे, गेल्या 10 वर्षात मोठ्या प्रमाणात उद्योजक भारतात वाढले आहेत, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी देशातील मोठमोठ्या
उद्योगपतींची संपत्ती आणि कमाईचे आकडेच वाचून दाखवले. तसेच, गौतम अदानींनी केवळ महाराष्ट्रातच नाही, तर काँग्रेस सरकार असलेल्या राज्यात, महाविकास आघाडीतील पक्षाच्या मुख्यमंत्र्यांसोबतही अनेक करार करुन उद्योग प्रस्थापित केल्याचे फोटो जाहीर सभेत दाखवले.
