किल्ले शिवनेरीवरील शिवजयंती महोत्सवाच्या अनुषंगाने आढावा बैठक; सुक्ष्म नियोजन करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

1 min read

पुणे दि.१३:- किल्ले शिवनेरी येथे शिवजयंती महोत्सव उत्साहाने साजरा करण्याच्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी सुक्ष्म नियेाजन करुन समन्वयाने काम करावे, शिवभक्तांना आवश्यक सुविधा पुरविण्याची व्यवस्था करा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार जुन्नर, सोहळ्याशी संबंधित विविध संस्थांचे प्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.डुडी म्हणाले, किल्ले शिवनेरी गडावर पुरात्व खात्याच्या परवानगीने कायमस्वरुपी स्वच्छतागृह उभारण्याकरिता वन विभागाने प्रस्ताव सादर करावा. जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत ग्रामविकास विभागाने पथ दिव्यासाठीचे खांब उभारण्याकरिता पुरात्व विभागाकडून डिझाईन मान्यता घेवून तसा प्रस्ताव तात्काळ सादर करावा,याकरिता जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. गडाच्या पायथ्याशी वाहनतळाची योग्य व्यवस्था करण्यात यावी. वाहनतळापासून ते पायथ्यापर्यंत बजाण्याकरिता शिवप्रेमींना मोफत बसेच व्यवस्था करावी. परिसरात पुरेशा प्रमाणात उजेड राहील यादृष्टीने दिव्यांची सुविधा करावी. वन आणि पुरातत्व विभागाने विद्युत व्यवस्था करावी. नगरपालिकेने पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, विद्युत रोषणाई,दिशादर्शक फलक, स्वच्छता आदी व्यवस्था करावी. आरोग्य विभागामार्फत पाण्याची तपासणी करावी. आरोग्य पथकासह रुग्णवाहिकांची व्यवस्था करावी. तसेच आरोग्य बूथवर मुबलक औषधे व ओआरएसची पाकिटे ठेवावी, राज्य परिवहन महामंडळाने आवश्यकते नुसार बसेसची व्यवस्था करावी. महिला व शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. कार्यक्रमाचे प्रक्षेपणासाठी गडाच्या पायथ्यापर्यंत मोठ्याआकाराच्या एलईडी स्क्रीन लावावेत.किल्ल्याची साफसफाई चांगल्या प्रकारे होईल तसेच शिवजयंतीच्या कालावधीत विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. बिबट्या आणि मधमाशाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपायोजना कराव्यात. पिण्याच्या पाण्याची तपासणी करावी. शिवजयंतीसाठी मागील वर्षी आलेल्या शिवप्रेमींची संख्या लक्षात घेत यावर्षीचे नियोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डुडी यांनी दिल्या.आगामी काळात किल्ले शिवनेरी गडावर शिवजयंती उत्सवासाठी येणाऱ्या शिवप्रेमींना पुरेसे पिण्याचे पाणी, वैद्यकीय उपचार, औषधे, स्वच्छतागृहे, विद्युत व्यवस्था, वाहनतळ, सांस्कृतिक कार्यक्रम आदी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करावे.आमदार शरद सोनवणे यांनी शिवजयंतीच्या अनुषंगाने सूचना केल्या. शहरात कायमस्वरुपी विद्युतव्यवस्था करावी. गडाच्या पायथ्यापासून ते किल्ल्यापर्यंत सोलारयुक्त दिवे बसवावे, असेही सोनवणे म्हणाले.कार्यक्रमाचे नियोजन करतांना विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांही विचारात घ्याव्यात. सोहळा उत्साहात आणि चांगल्यारितीने साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!