वाढते अपघात रोखण्यासाठी कल्याण- नगर महामार्गावर गतिरोधक पांढरे पट्टे
1 min read
ओतूर दि.१९:- नगर- कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर ओतूर येथील मोनिका चौक खामुंडी व महामार्गालगतच्या शाळा, महाविद्यालये अशा महत्वाच्या ठिकाणी गतिरोधक पांढऱ्या पट्ट्या बसविण्यात आल्याने प्रवाशी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.
महामार्गावर एका पाठोपाठ एक होणाऱ्या अपघातांच्या मालिकेने मोनिका चौक, खामुंडी गावची शाळा ही जणू अपघातांची केंद्रच बनली होती.महामार्गावर अत्यंत वेगवान धावणारी सुसाट वहाने अपघातास कारणीभूत ठरत होती.सूमारे दोन वर्षांपूर्वी या महामार्गाचे रुंदीकरण होऊन मजबुतीकरण करण्यात आले. ओतूरचा संपूर्ण परिसर झपाट्याने शहरीकरणाकडे झेपावला असताना मुंबईकडे जाणारा हा अत्यंत वर्दळीचा महामार्ग अपघातांचे आक्राळ विक्राळ रूप धारण करताना निदर्शनास आले होते.
ओतूर कॉलेज, कोळमाथा,एस टी बसस्थानक,मोनिका चौक,अहीनवेवाडी फाटा ही या महामार्गावरील अपघातांची प्रमुख केंद्र बनली आहेत. या संपूर्ण परिसरात अद्यापपर्यंत अपघात घडून काहीजण बळी गेले आहेत. तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. दि.१ रोजी रात्री ९ वा.३० च्या दरम्यान कार व ट्रकचा मोनिका चौक येथे अपघात झाला सदर अपघातात केवळ दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवित हानी झाली नव्हती मात्र तीन वहानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान कल्याण- नगर महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक, स्पीड ब्रेकर बसवणे नागरिकांना जीवदान ठरणारे आहे. अलीकडच्या काळात रस्ते गुळगुळीत व चकाचक झाल्याने वहानांचा वेग कमालीचा वाढला आहे मात्र वेगावर नियंत्रण येण्याकामी उपाययोजनांचा अभाव बघायला मिळत आहे. ज्या वेगात रस्ते दुरुस्त झालेत त्या वेगात उपाययोजना न राबविल्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याचे अपघातांच्या वाढत्या प्रमानावरून लक्षात आले.
या बाबत ओतूर पोलीस स्टेशनचे एपीआय सचिन कांडगे यांनीही पाठपुरावा करताना राष्ट्रीय महामार्ग रस्ता दुरुस्तीचे जितेंद्रसिंग ग्रुप या कंपनीचे व्यवस्थापक सतीश बागल व दीपक गुंजाळ यांचेशी संपर्क करून महामार्गावरील उणिवा निदर्शनास आणून दिल्या त्यांनी तात्काळ निर्णय घेत महामार्गावर आवश्यकतेनुसार विविध ठिकाणी पांढऱ्या पट्ट्याचे गतिरोधकाचे काम तूर्तास पूर्ण केले आहे. त्यामुळे संभाव्य अपघातांना काही प्रमाणात आळा बसणार असून सदरच्या कामाबाबत सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
“नगर कल्याण महामार्गावर ओतूर कॉलेज, कोळमाथा,एस टी बसस्थानक,अहीनवेवाडी फाटा, खामुंडी या संपुर्ण परिसरात रस्ता दुभाजक, स्पीड ब्रेकर, सूचना फलक,सिग्नल असणे अत्यंत गरजेचे आहे. तर मोनिका चौकात एका सर्कलची निर्मिती केल्यास संभाव्य अपघातांना टाळता येऊ सहज.”
कैलास बोडके
(सामाजिक कार्यकर्ते )