वारूळवाडीत महिलेचे १ तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले

1 min read

नारायणगाव दि.१६:- दुचाकीवरून पती समवेत घरी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रातील सुमारे १ तोळे वजनाचे सोने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास वारूळवाडी येथील वृंदावन पार्क सोसायटीजवळ घडली. याबाबतची तक्रार ममता सतीश तंवर (वय ५४, रा. वारूळवाडी) यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात दिली. ममता तंवर यांनी नारायणगाव येथील मीनथडी जत्रेत भेळ विक्रीचा स्टॉल लावला होता. सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्या पती सतीश तंवर यांच्यासमवेत दुचाकीवरून घरी निघाल्या होत्या. त्यावेळी तरुणाने वारूळवाडी येथील सुयोग सोसायटीजवळ त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्राला हिसका मारला. यामुळे दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र तुटले. यापैकी मंगळसूत्रातील एक तोळा सोने घेऊन चोरटा पसार झाला. याही अवस्थेत सतीश तंवर यांनी चोरट्याचा दुचाकीवर पाठलाग केला. मात्र, चोरटा पसार झाला. दरम्यान, मागील आठवड्यात साळवाडी येथील पूजा राहुल चव्हाण या महिलेच्या गळ्यातील सुमारे दीड तोळा वजनाचे मंगळसूत्र नारायणगाव बसस्थानक आवारातून अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे