पादिरवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू; दोन दिवस भव्य बैलगाडा शर्यती
1 min read
आळेफाटा, दि.२४:- पादिरवाडी (ता. जुन्नर) येथे हनुमान मंदिर व सभागृहात सालाबाद प्रमाणे यंदाही दि. २४ ते ३१ मार्च या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. हरिनाम सप्ताहाचे यंदाचे ४५ वे वर्ष आहे. हरिनाम सप्ताहात दैनंदिन कार्यक्रमांमध्ये पहाटे चार ते सहा काकडा, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी नेमाचे भजन, सायंकाळी प्रवचन, त्यानंतर हरिपाठ, रात्री सात वाजता कीर्तन आणि कीर्तन संपल्यावर महाप्रसाद आणि रात्रभर श्रीहरी जागर होणार आहे.
सप्ताहात सोमवारपासून रविवारपर्यंत रोज रात्री सात वाजता अनुक्रमे हभप निलेशमहाराज बोडके,हभप सोनालीताई नरवडे, हभप वैष्णवीताई म्हात्रे, हभप शारदाताई जाधव, हभप गुलाब महाराज खालकर, हभप कवीराज महाराज झावरे, हभप दीपक महाराज देशमुख यांचे तर हभप मनोजमहाराज मोरे
यांचे सोमवारी सकाळी नऊ वाजता काल्याचे कीर्तन होणार आहे. तसेच हभप यशवंत पादीर, रामदास महाराज चव्हाण, हभप कान्हुराज पादिर, हभप सुरेश महाराज भोर आणि सीताराम महाराज सहाणे यांची प्रवचन सेवा होणार आहे.
दरम्यान दि. २९ व ३० मार्च रोजी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ३० मार्च रोजी सायंकाळी चार ते सहा कानिफनाथ महाराज यात्रा उत्सव निमित्त काठीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.