अवकाळी पावसाचे ढग दूर; उन्हाचा चटका जाणू लागला

1 min read

पुणे दि.२४:- गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. अवकाळी पावसाचे ढग दूर गेल्यानंतर तापमानात वाढ होताना दिसतंय. उन्हाचा चटका आता परत जाणू लागला आहे. ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढल्याचे बघायला मिळतंय. पुढील २४ तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांमधील कमाल आणि किमान तापमान ३४ अंश सेल्सिअस आणि २४ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.दुसरीकडे मराठवाड्यात देखील तापमानात मोठी वाढ होताना दिसतंय. कोकणात आज उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. रविवारी बुलढाण्यात ३९ अंश सेल्सिअस तापमानाची सर्वाधिक नोंद झाली. विदर्भातही आता अवकाळी पावसानंतर पारा वाढताना दिसतोय. अकोल्यात काल पारा ३९ अंशांवर केल्याचे बघायला मिळाले. चंद्रपूरमध्येही तापमान वाढत आहे. अवकाळी पावसाचा फटका चंद्रपूरमध्ये बसला. दोन ते तीन दिवस उष्णतेपासून दिलासा चंद्रपूरवासीयांना मिळाला होता. चंद्रपूर, भंडारा, अमरावती, सोलापूर, यवतमाळ, मालेगाव याठिकाणी पारा ३७ अंश सेल्सिअसच्यावर होता.आज उन्हाचा चटका अधिक जाणवणार असल्याचा अंदाज हा वर्तवण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. लातूरमध्ये अवकाळी पाऊस पडल्याने मागील काही दिवस वातावरणात गारवा होता. मात्र, आता तिथेही उष्णता वाढताना दिसणार आहे. होळीनंतर राज्यात अवकाळीचे संकट आले. काही भागांमध्ये अवकाळी पाऊसही पडला. पारा काही प्रमाणात खाली गेल्याचे बघायला मिळाले. आता परत ऊन वाढत आहे. काही ठिकाणीनंतर मार्च महिन्यातच पाणीटंचाई निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय. आतापर्यंत हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा दोनदा इशारा देण्यात आलाय. काही ठिकाणी अवकाळी पावसाचाही इशारा देण्यात आला होता. कोकणात उष्णतेत वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे