रत्नागिरी ‘हापूस’चे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

1 min read

पुणे दि.२४:- स्थानिक बाजारपेठेत ‘रत्नागिरी हापूस’ विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. मात्र, आंब्याचे दर अजूनही सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारे असल्याने सर्वसामान्यांसाठी आंबा ‘अगाेड’च आहे. सध्या बाजारात ८०० ते १६०० रुपये डझन दराने आंब्याची विक्री केली जात आहे. हा दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.यावर्षी नैसर्गिक दृष्टचक्रामुळे जेमतेम २५ ते ३० टक्केच आंबा उत्पादन आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उष्म्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे फळांची माेठ्या प्रमाणात गळ झाली. शिवाय फळे भाजली असून, फळांवर डाग पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे. वाढत्या उष्म्यामुळे तयार आंबा शेतकरी विक्रीसाठी मुंबई, पुणे बाजारात पाठवत आहेत. मात्र, आंब्याची आवक वाढल्याने दरही घसरले आहेत. त्यामुळे आता स्थानिक बाजारात आंबा विक्रीसाठी येऊ लागला आहे.स्थानिक बाजारपेठेत सध्या हापूस ८०० ते १६०० रुपये डझन आहे. हा दर सर्वसामान्यांना न परवडणारा आहे. शिमगाेत्सवासाठी गावी आलेल्या काही चाकरमान्यांनी किरकाेळ स्वरूपात हापूसची खरेदी केली. मात्र, चढ्या दरामुळे खरेदीचे प्रमाण कमी आहे. सध्या पायरीलाही हापूसचा दर असल्याने आंबा अजूनही ‘अगाेड’च राहिला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे