कॉमेडियन कुणाल कामराचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाणे; शिवसैनिक खवळले; कामराच्या शोच्या सेटची केली तोडफोड

1 min read

मुंबई दि.२४:- कॉमेडियन कुणाल कामरा यांनी शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाणे गायले आहे. या गाण्याच्या बोलवरुन शिवसेना संतप्त झाली आहे. त्यांनी कॉमेडियन कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या गाण्यात कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांना गद्दार संबोधिले आहे. यावरून शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी कुणाल कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केली आहे. तसेच ठाण्यात कामराचे फोटो जाळले व निदर्शने केली.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्यातून व्यंगात्मक टीका केल्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते हे कुणाल कामराच्या विरोधात आक्रमक झाल्याचं दिसून आलं. अंधेरीचे आमदार मुरजी पटेल यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये कुणाल कामराविरोधात तक्रार दाखल केली आहे. कुणाल कामराचे हे गाणं एकनाथ शिंदे यांची बदनामी करणारं असल्याचं मत शिंदे गटाकडून व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे कुणाल कामराच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी असा एक मतप्रवाह आहे. शिवसेना नेते व मंत्री उदय सामंत म्हणाले कि, कोण हा कुणाल कामरा? जर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात काही गाणे गायले असेल तर त्याच्या विरोधात शिवसेना आक्रमक होणार आहे.आमचे आमदार मुरजी पटेल हे कुणाल कामरा यांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करतील. त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसैनिक आक्रमक होतील. शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या, कुणाल कामरा याने आज रात्री १२ वाजेपर्यंत माफीनामा मागितला नाही तर संपूर्ण शिवसेना महिला आघाडी कुणाल कामराच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान, रात्री उशीरा कुणाल कामरा विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी शिवसेना आमदार मुरजी पटेल एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहोचले. कुणाल कामराने विनोदाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे मुरजी पटेल यांनी तक्रार दिली. तर शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पहावयास मिळत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे