घरकुलासाठी मिळणार मोफत वाळू; राज्य सरकारचा निर्णय:- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

1 min read

नागपूर दि.१६:- राज्यात घरकुल बांधणाऱ्या लाखो लोकांना राज्य सरकारने खूशखबर दिली आहे. आता राज्यात घरकुल बांधणाऱ्यांना मोफत वाळू मिळणार आहे. घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, या निर्णयाची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

तसेच लवकरच मंत्रीमंडळ बैठकीत वाळूधोरण मांडणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा घरकुल बांधत असलेल्या लाखो लोकांना होण्याची शक्यता आहे.

याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी लिलाव झालेले नाहीत. ज्या ठिकाणी आम्हाला एन्व्हायरमेंट क्लियरन्स मिळाला आहे. त्या ठिकाणी वाळू घाटांचं लिलाव होईल. तसेच घरकुलांना पाच ब्रास मोफत रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यासाठीही आम्ही तरतूद करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. एकंदरीत जेवढी मागणी असेल, तेवढा पुरवठा असं वाळू धोरण आपण तयार करत आहोत. त्यासाठी एम सँड धोरण येत आहे. त्यामध्ये दगड खाणींमधून येणाऱ्या वाळूसाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टोन क्रशरसाठी प्रोत्साहन देत आहोत.

त्या माध्यमातून दगडापासून मोठ्या प्रमाणात वाळू तयार होणार असून, त्यामुळे नदीतील वाळूची मागणी कमी होईल. तसेच येत्या दोन वर्षांत वाळूची मागणी आणि पुरवठा यामध्ये जी काही तफावत आहे ती दूर होणार आहे.

घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याच्या निर्णयाचा फायदा घरकुल बांधत असलेल्या लाखो लोकांना होणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. राज्य सरकार या आठवड्यात सर्वसमावेशक वाळू धोरण मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार आहे. याबाबत अनेक सूचना जनतेकडून आल्या होत्या, त्यांचा समावेश यामध्ये केला असल्याचे बावनकुळे म्हणाले.

अधिकाऱ्यांच्या आजवर आठ बैठका घेण्यात आल्या होत्या. यावेळी बावनकुळे म्हणाले की, राज्यात ज्या ठिकाणी वाळू घाटांचे लिलाव झाले नाहीत आणि ज्या ठिकाणी पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली आहे, अशा ठिकाणी घाट सुरू करण्याचा निर्णय हे नवीन वाळू धोरण मंजूर झाल्यानंतर घेतला जाणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे