विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांना ऑलिम्पियाड स्पर्धेत घवघवीत यश
1 min read
साकोरी दि.६:- विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी, साकोरी (ता.जुन्नर) येथे नोव्हेंबर २०२४-२५ मध्ये सिल्व्हर झोन फाउंडेशन, नवी दिल्ली मार्फत सर्व विषयांसाठी ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षा एक प्रकारची स्पर्धात्मक परीक्षा आहे. जी शाळांमध्ये घेतली जाते, ज्यामध्ये सर्वोत्तम क्षमता, प्रतिभा, अभिरुची आणि बुद्धिमत्ता असलेल्या अपवादात्मक विद्यार्थ्यांना निवडले जाते. ऑलिंपियाड केवळ मूलभूत विषयांचीच चाचणी घेत नाहीत तर ते मुलांमध्ये तार्किक तर्कशक्ती देखील वाढवतात.
ते विचार करण्याची क्षमता, समस्या सोडवण्याची कौशल्ये, आत्मविश्वास वाढवतात आणि म्हणूनच; लहान वयातच मुलाची सर्वांगीण वाढ होण्यास मदत करतात.विद्यालयातील अगदी ज्युनिअर के.जी ते ९ वी पर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
त्यापैकी विज्ञान व इंग्लिश विषयांचा निकाल लागला. त्यामधे विद्यानिकेतन च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. विज्ञान ऑलिम्पियाड मध्ये एकूण १५ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके, ७ विद्यार्थ्यांनी रौप्यपदके आणि ५ विद्यार्थ्यांनी कांस्यपदके पटकावली.
तसेच इंग्रजी विषयामध्ये ५ विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदके, ६ विद्यार्थ्यांनी रौप्य पदके आणि ४ विद्यार्थ्यांनी कांस्य पदके पटकावली. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला.या समारंभासाठी संस्थेचे संस्थापक पांडुरंग साळवे तसेच विद्यालयाच्या प्राचार्या,
रुपाली पवार (भालेराव), उपप्राचार्य शरद गोरडे, पी एम हायस्कुलचे प्राचार्य रमेश शेवाळे तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते. संस्थापक तसेच प्राचार्या यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण स्पर्धा परीक्षेचे नियोजन विभाग प्रमुख गणेश करडीले यांनी केले.
तसेच विज्ञान व इंग्रजी विषयशिक्षक प्रतिभा गाडगे, श्रद्धा वाघ, अनिता हाडवळे, दिपाली ढवळे, विशाल जाधव यांनी सर्व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून या परीक्षेची तयारी करून घेतली त्यासाठी प्राचार्या रुपाली पवार (भालेराव) यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.