दिलीप वळसे पाटील महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न
1 min read
निमगाव सावा दि.२८:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित व श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित, दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न झाला.यावेळी महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषेचा गौरव वाढविण्याच्या दृष्टिकोनातून महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थ्यांनी पोस्टर तयार करून आणले व त्याचे पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये अर्थशास्त्र व वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्प 2025 या विषयावर पोस्टर प्रदर्शन केले.
इतिहास विभागातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवराय यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त पोस्टर प्रदर्शन केले. प्रथम वर्ष कला वर्गातील प्रथम वर्ष कला वर्गातील विवेक कोरडे याने यावेळेस शिवगर्जना देऊन संपूर्ण परिसर शिवमय केला. तसेच मराठी व राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पोस्टर प्रदर्शन केले.
विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी असणाऱ्या विज्ञान दिनानिमित्त यावेळी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते.मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्त आयोजित व्याख्यानमालेसाठी सेवानिवृत्त आदर्श शिक्षक प्रा. विठ्ठल महामुनी, ज्येष्ठ कवी प्रा. ज्ञानेश्वर धुमाळ व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रल्हाद शिंदे यांनी मराठी भाषेच्या संदर्भात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. विठ्ठल महामुनी म्हणाले की, दर दहा कोसांवर भाषा बदलते. इंग्रजीचे मराठी भाषेवर होत चाललेले अतिक्रमण यावेळेस त्यांनी सांगून मराठी भाषा बोलून मराठी भाषेचा विकास आपणच केला पाहिजे या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. शुद्ध बोला, भाषा सुधारा, अश्लील बोलू नका. त्याचप्रमाणे यावेळी त्यांनी मराठी गझल सादर करून उपस्थितांची मने जिंकली.प्रा. ज्ञानेश्वर धुमाळ यांनी मराठी राजभाषा दिन व मराठी भाषा गौरव दिन यातील फरक सांगून आज पर्यंत अकरा भाषांना देशामध्ये अभिजात भाषांचा दर्जा प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. सर्वच संतांनी मराठी भाषेच्या विकासामध्ये विशेष कार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी मराठी भाषेतील गाजलेल्या स्वतःच्या कवितांचे काव्यवाचन करून प्रेक्षकांना उदबोधित केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रल्हाद शिंदे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे याबद्दल अभिजात संकल्पना स्पष्ट करून सांगितली. मराठी भाषेचा इतिहास सांगून मराठी भाषा अभिजात होण्यामध्ये योगदान असणाऱ्या मराठी साहित्याचे विविध टप्पे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयामध्ये यावेळी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. व सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी महाविद्यालयातील द्वितीय वर्ष कला वर्गातील साईनाथ कोयमहाले, तृतीय वर्ष वाणिज्य वर्गातील प्रीती भोर, व प्रथम वर्ष विज्ञान शाखेतील रुबीना मणियार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयातील प्रा. ज्योती गायकवाड व प्रा. माधुरी भोर यांनी आपल्या आवडत्या कवितांचे वाचन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा. संदिपान पवार हे उपस्थित होते.
याप्रसंगी महाविद्यालयातील तीनही विद्या शाखांमधील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सुभाष घोडे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अनिल पडवळ तर आभार गणित विभाग प्रमुख प्रा. आकाश धुमाळ यांनी व्यक्त केले.